ठाणे : नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात हिंदी दिवस आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदी राजभाषेच्या वापराला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय संमेलनासाठी केंद्र सरकारच्या विविध विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बँका, सरकारी यंत्रणा आणि इतर संस्थांमधील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच सिडको प्रदर्शन केंद्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली.
केंद्र सरकारच्या विविध विभागांतील देशभरातील सुमारे सात हजार अधिकारी, राजभाषा कर्मचारी, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ या संमेलनासाठी नवी मुंबईत दाखल झाले आहेत. हिंदीचा प्रशासकीय कामकाजातील वापर वाढविणे, राजभाषेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करणे तसेच हिंदीच्या प्रचार-प्रसाराला चालना देणे, हा या संमेलनामागील प्रमुख उद्देश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोमवारी या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
या संमेलनासाठी केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील अधिकारी उपस्थित राहणार असतानाच, बँकांमधील वरिष्ठ अधिकारी तसेच सरकारी आणि केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध विभागांतील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. गणेश चतुर्थी निमित्त सर्व विभागांना सुट्टी आहेत. परंतु या संमेलनासाठी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती दिसून येत आहे. दरम्यान, सकाळी दहा वाजल्यापासूनच सिडको प्रदर्शन केंद्र परिसरात सरकारी वाहने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची ये-जा वाढली होती. विविध विभागांतील अधिकारी संमेलनस्थळी दाखल होत असल्याने परिसरात मोठी लगबग पाहायला मिळाली.
