बदलापूर: निसर्गप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या काही वर्षात हिरव्या देवाची यात्रा आयोजित केली जाते. यंदा हिरव्या देवाच्या यात्रेचा दुसरा टप्पा मुरबाडच्या मासले बेलपाडा येथे आयोजित करण्यात आला होता. अश्वमेध प्रतिष्ठान, श्रमिक मुक्ती संघटना आणि इंटॅक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
रानभाजांची शहरी व्यक्तींना ओळख व्हावी, त्याची बनवण्याची पद्धत त्यांना कळावी या हेतूने दरवर्षी येथे रानभाजा महोत्सव भरवला जातो. यंदाही रानभाजांचे प्रदर्शन आणि तयार भाज्या मांडण्यात आल्या होत्या. उपस्थितांनी या रानभाज्याचा आस्वाद घेतला. अनेकांनी या रानभाजा विकत घेत त्याची पाककृती समजून घेतली. आदिवासी समाजातील ठाकूर आणि कातकरी महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी बांबूपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू, संकलित केलेले मध, तेल, मोहाची फुले, औषधी वनस्पती, विविध प्रकारच्या बियाही विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.
मल्लखांब क्षेत्रात पद्मश्री मिळालेले उदय देशपांडे यांच्या मदतीने मासले बेलपाडा येथे मल्लखांबाची उभारणी केली जाते आहे. त्याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले. कोमल पाटील, अंकुश कामडी यांनी केलेल्या सादरीकरणाने उपस्थित थक्क झाले. याच सादरीकरणाने या यात्रेची सुरुवात झाली.
रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाइड आणि कल्याण रिव्हारसाइड चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने अश्वमेध प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने येथे दोर मल्लखांबाची स्थापना करण्यात आली. वतीने येथे दुर्मिळ आणि ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय उभारले जाते आहे.. याचीही पाहणी यावेळी उपस्थितांनी केली. तसेच येथे असलेल्या प्राणी, पक्षी उपचार आणि पुनर्वसन केंद्राचीही माहिती उपस्थितांनी जाणून घेतली.याप्रसंगी अश्वमेध प्रतिष्ठान संस्थेचे अविनाश हरड, श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे, रोटरी क्लबचे सदस्य आणि पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निसर्ग संपत्तीसुद्धा जपली पाहिजे
हा हिरवा निसर्ग ही आपली संपत्ती आहे. आज पुढच्या पिढ्यांसाठी पैसा, मालमत्ता कमवून ठेवण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. मात्र भविष्यात जर पाणी, हिरवा निसर्ग, नद्या, जंगल, प्राणी, फळे राहिलीच नाही तर पुढच्या पिढ्या काय करतील. मानवाने आजच पुढच्या तीन पिढ्यांचे पिण्यायोग्य पाणी वापरुन संपवून टाकले आहे. त्यामुळे निसर्गाला संपत्ती मानून तीसुद्धा जपली पाहिजे, असे मत श्रमिक मुक्ती संघटनेच्या इंदवी तुळपुळे यांनी व्यक्त केले.