ठाणे : मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा दावा करणाऱ्या तसेच परप्रांतीयांविरोधात आंदोलन करत राजकारणाची सुरुवात केलेल्या मनसेने आता हिंदूत्वाचा मुद्दा जवळ केल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मंगळवारी होणाऱ्या ठाण्यातील सभेपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील पाचपाखाडी भागात ‘मुंबई मे बैठा हिंदूओ का राजा, अपनी हिफाजत चाहिए तो मनसे में आजा’ अशा आशयाचे फलक उभारले आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्दय़ावरून मनसेने आता हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर उडी घेतल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.
शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. २००८ मध्ये परप्रांतियांमुळे मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नसल्याच्या मुद्दय़ावर राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून उत्तरभारतीयांना लक्ष्य करण्यास सुरुवात केले होते. त्यानंतर रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तरभारतीय विद्यार्थ्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या आंदोलनाची चर्चा संपूर्ण देशभर सुरू होती. तसेच राज ठाकरे यांच्या भाषण शैलीची अनेक मराठी तरुणांना भूरळ पडली होती. त्यामुळे मोठय़ाप्रमाणात मनसेमध्ये सभासद नोंदणी झाली. तसेच मुंबईत मनसेचे आमदारही निवडून आले होते. गेल्या काही वर्षांपासून मनसे हिंदूत्वाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांवर टीका करत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशीही राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मंगळवारी राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेसाठी ठाण्यातील विभागाध्यक्ष महेश कदम यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ हिंदी भाषेमध्ये एक फलक उभारले आहे. या फलकामध्ये त्यांनी प्रामुख्याने मराठीऐवजी हिंदूओ का राजा असा राज ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.