फेर‘फटका’ : होर्डिग्जचा विळखा सुटणार?

शहरातील प्रत्येक नाक्यानाक्यांवर असे वाढदिवसाचे फलक लागलेले दिसून येतात.

 

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्वत्र ठिकाणी रस्तारुंदीकरणात अडसर असलेल्या बांधकामांवर कारवाई सुरू आहे. या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. विस्थापितांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासनही आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे आयुक्तांचे अभिनंदन करणारे फलक लागलेले दिसून येत आहे. असे जरी असले तरी शहरात विविध ठिकाणी शुभेच्छा देणाऱ्या होर्डिग्जवर कधी कारवाई होणार याकडे आता ठाणेकरांचे लक्ष लागलेले आहे.

ठाणे शहरासह कळवा, मुंब्रा, दिवा परिसरांत शुभेच्छा देणारे विवधि कार्यक्रमांचे फलक लागलेले दिसून येतात. सर्वसामान्य नागरिकांना फलकावर झळकत असलेल्या फोटोशी सर्वसामान्य ठाणेकरांचे काही देणेघेणे नाही. त्यामुळे नेहमी सकाळी अशा लोकांचे चेहरे जबरदस्ती का पाहावे, असा प्रश्नही मनात आल्यावाचून राहात नाही. असे होर्डिग्ज शहराच्या विद्रुपीकरणात भर पाडत आहेत. सध्या ठाणे महापालिका स्मार्ट सिटीच्या दिशेने पावले उचलत आहे. आयुक्तांच्या धडक कारवाईमुळ शहर मोकळे होण्यास मदत होत आहे.  त्यामुळे आयुक्तांनी अशा शुभेच्छा देणाऱ्या होर्डिग्जवरही बंदी आणावी व असे होर्डिग्ज लावण्यास संबंधित विभागाने परवानगीच देऊ नये असे नियम करणे आवश्यक आहे.

शहरातील प्रत्येक नाक्यानाक्यांवर असे वाढदिवसाचे फलक लागलेले दिसून येतात. कळवा नाका, रेतीबंदर, जांभळी नाका, टेंभीनाका,  हरिनिवास अशा प्रत्येक नाक्यावर मोठमोठे होर्डिग्ज दिसून येतात. राजकीय नेत्यांपासून ते शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंतची छायाचित्रं यावर असतात. तसेच ज्याचा वाढदिवस आहे त्यालाही अनेक दादा, भाई, साहेब अशी टोपण नावे झळकत असल्याचे पाहावयास मिळते. या सर्वाशी सर्वसामान्यकरदात्या ठाणेकरांचा काहीही संबंध नसतो. तरीही त्यांचे चेहरे नागरिकांना विनाकारण पाहावे लागतात. याउलट जरी नागरिकांना माहिती देणारे फलक लावले तर नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होइल. यंदा महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. ठाणे शहरातही  दुष्काळग्रस्त छावण्या उभारण्यात आल्या आहेत.  होर्डिग्ज लावण्यासाठी घ्यावी लागणारी परवानगी ते बनविण्यासाठी येणारा खर्च हा जर दुष्काळग्रस्तांना दिला तर खऱ्या अर्थाने वाढदिवस सत्कारणी लागेल आणि त्यांचा दुवा नक्कीच मिळेल. अनेक राजकीय नेते वाढदिवसाअगोदर वाढदिवसाचे होर्डिग्ज लावू नका असे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना देतात तरीही उत्साही कार्यकर्ते आपण किती थोर आहोत किंवा जवळीक साधण्यासाठी आपल्या नेत्यांचे मोठमोठे होर्डिग्ज लावतात. अशा कार्यकर्त्यांवर  संबंधित नेत्यांनीच कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच नुसतेच वाढदिवशी नव्हे तर दोन ते तीन दिवस व नंतरही काही दिवस हे होर्डिग्ज लटकलेले असतात. एकूणच या होर्डिग्जमुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

ठाणे शहरात व परिसरात अधिकृत किंवा अनधिकृतपणे लावल्या जाणाऱ्या होर्डिग्जवर वेळीच बंधने आणणे गरजेचे आहे. त्यासाठी आता आयुक्त संजीव जयस्वाल यांनीच पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडविला तर नक्कीच ठाणे शहर होर्डिग्जमुक्त होईल असा विश्वास ठाणेकरांना वाटत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hoardings issue in thane

ताज्या बातम्या