scorecardresearch

धुंद धुळवडीचा २६६ जणांना फटका; एक लाखाहून अधिक दंड वसूल; तीन महिन्यांसाठी वाहनचालक परवाना रद्द

अनेक तरुणांच्या पालकांना पोलिसांनी आपल्या पाल्यांच्या कृत्याबद्दलची माहिती दिली.

होळी निमित्त आयोजित धुळवडीचा कार्यक्रम साधेपणात साजरा करा, असे आवाहन कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन, पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी करूनही शुक्रवारी धुळवडीच्या दिवशी अनेक उत्साही तरुणांनी मद्यपान करून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून धुळवड साजरी केल्याने अशा एकूण २६६ जणांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.


डोंबिवली, कल्याण आणि कोळसेवाडी वाहतूक विभागांतर्गत ही कारवाई करण्यात आली. कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, डोंबिवली विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, कोळसेवाडी विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीस, वाहतूक सेवकांनी कारवाई केली.


होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवडीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस, वाहतूक पोलिसांनी शहराच्या विविध भागात बंदोबस्त लावला होता. या कालावधीत अनेक उत्साही तरुणांनी मद्यपान, भांग, ताडी नशा आणणारी पेय पिऊन दुचाकी वाहने चालवली. एक दुचाकीवर दोन आसनांची क्षमता असताना एकेका दुचाकीवर तीन ते चार तरुण बसले असल्याचे आढळले. दुचाकीस्वाराकडे वाहनाची कागदपत्र, विम्याची कागदपत्रे नव्हती. दुचाकी चालवताना या तरुणांनी आपल्यामुळे रस्त्यावरील पादचाऱ्यांना, त्याला धोका होईल याचा विचार केला नव्हता. वाहतूक नियमांचे भंग केल्याने अशा सर्व तरुणांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक अधिकारी तरडे यांनी दिली. अशा सर्व दुचाकी स्वारांना जागीच अडवून त्यांना प्रथम त्यांनी केलेली कृती कशी चुकीची आहे हे निदर्शनास आणले. त्यांच्यासमोर त्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यांनी केलेल्या चुकीची माहिती देण्यात आली.


धुलीवंदनाच्या दिवशी शुक्रवारी ५९ मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. कल्याण शहर वाहतूक शाखेने २४ मद्यपी मोटार, दुचाकी चालक, कोळसेवाडी वाहतूक शाखा यांनी २५ मद्यपी वाहन चालक आणि डोंबिवली वाहतूक शाखेतर्फे १० मद्यपी अशा एकूण ५९ चालकांवर मोटर वाहन कायदा कलम १८५ व १८८ अन्वये कारवाई करण्यात आली.


दुचाकी चालवताना शिरस्त्राण न घातलेल्या १२५ वाहनांवर व दुचाकीवर तीन जण बसून प्रवास करत असलेल्या ६९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ५९ मद्यपी वाहन चालकापैकी ११ जणांना वाहतूक अधिकाऱ्यांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालय येथे हजर केले. न्यायालयाने वाहन चालकांनी केलेल्या वाहतूक नियमांच्या भंगाबद्दल प्रत्येकी १० हजार रुपये दंड असा एकूण एक लाख दहा हजार दंड व इतर पाच जणांकडे परवाना नसल्यामुळे प्रत्येकी पाच हजार दंड अतिरिक्त २५ हजार असे एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारवाई झालेल्या वाहनचालकांचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे, असे तरडे यांनी सांगितले. तरी वाहनचालकांनी मद्यप्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Holi traffic police took action against drink and drive thane kalyan dombivali vsk