‘एमसीएचआय-क्रेडाई’च्या कल्याण-डोंबिवली शाखेने नागरिकांना आपल्या स्वप्नातील घर खरेदी करण्याची संधी मिळावी, या उद्देशातून ६ ते ९ एप्रिल या कालावधीत गृह प्रकल्पांचे प्रदर्शन कल्याणमध्ये आयोजित केले आहे. कल्याण-डोंबिवली, टिटवाळा परिसरात उपलब्ध होत असलेल्या विविध नागरी सुविधांची माहिती इतर शहरातील नागरिकांना व्हावी, हाही या प्रदर्शनाचा उद्देश आहे, अशी माहिती या प्रदर्शनाचे प्रकल्प समन्वयक दिनेश मेहता यांनी दिली. हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यात बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे बेकायदा बांधकामांची उभारणी ‘एमसीएचआय-क्रेडाई’ कल्याण-डोंबिवली शाखेतर्फे भरविण्यात येणारे हे बारावे गृह प्रकल्प प्रदर्शन आहे. कल्याण पश्चिमेतील लालचौकी आणि दुर्गाडी किल्ला भागातील फडके मैदानात हे प्रदर्शन भरणार आहे. सकाळी ११ ते रात्री नऊ या कालावधीत हे प्रदर्शन नागरिकांकासाठी खुले असणार आहे. प्रदर्शनाला चार दिवसांच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक दिवस भेट देणार आहेत, अशी माहिती ‘एमसीएचआय’चे रवी पाटील यांनी दिली. यावेळी ‘एमसीएचआय’ कल्याण-डोंबिवली शाखेचे अध्यक्ष भरत छेडा, सचिव अरविंद वरक, राहुल कदम, सुनील चव्हाण उपस्थित होते.अनेक नागरिकांना घर खरेदी करण्याची इच्छा असते. पण मुंबई परिसरातील घर खरेदी करणे त्यांना तेथील किमतीमुळे शक्य होत नाही. काही नागरिक मुंबई शहर परिसरात आपले दुसरे घर असावे या उद्देशाने घर खरेदीच्या प्रयत्नात असतात. अशा नागरिकांना मुंबईपासून ४५ ते ५५ मिनिटाच्या अंतरावरील कल्याण-डोंबिवली, टिटवाळा शहर परिसरात त्यांच्या आर्थिक आवाक्यातील किमतीत घर खरेदी करण्याची संधी मिळावी हाही या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे, असे रवी पाटील यांनी सांगितले. हेही वाचा >>>ठाणे: जिल्हा रुग्णालयातील माणसातील देवमाणूस कल्याण डोंबिवली शहर परिसरात उड्डाण पूल, मेट्रो, जलवाहतूक, उन्नत मार्ग, नवीन प्रस्तावित रस्ते, पूल होत आहेत. दळणवळणाचे मोठे केंद्र येत्या काळात हे शहर असणार आहे. या प्रकल्पांची माहिती नागरिकांना व्हावी. कल्याण, डोंबिवली शहरांचे ‘मार्केटिंग’ या प्रदर्शनाच्या निमित्ताने व्हावे हा दुहेरी उद्देश या प्रदर्शनाचा आहे, असे पाटील म्हणाले.या प्रदर्शनात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, शिळफाटा परिसरातील ४० हून अधिक विकासक त्यांचे १५० हून अधिक गृह प्रकल्प या प्रदर्शनात मांडणार आहेत. चार दिवसाच्या कालावधीत कल्याण परिसरासह मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील सुमारे २५ हजाराहून अधिक नागरिक घर खरेदीसाठी या प्रकल्पाला भेट देतील. १६ लाखापासून ते एक कोटी किमतीची घरे या प्रदर्शनात असतील, असे पाटील यांनी सांगितले. प्रदर्शनात घराची नोंदणी करणाऱ्या नागरिकांना घर खरेदीत सूट देण्यात येणार आहे. प्रसिध्द अभिनेते श्रेयस तळपदे या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. तसेच, केंद्रीय मंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, आ. विश्वनाथ भोईर, पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे या प्रदर्शनाला भेट देणार आहेत.