उन्हाळ्यात खवय्यांच्या खवय्येगिरीसाठी वसईतल्या गृहिणींकडून अनेक पर्याय उपलब्ध केले जात आहेत. महिलांनी घरच्या घरी तयार केलेल्या कुरडया, पापड, शेवया अशा वाळवणीच्या आणि लोणची, मुरांबा यांसारख्या साठवणुकीच्या पदार्थाना रेडिमेड आणि ‘बँड्रेड’ उत्पादनांच्या तुलनेत वसई-विरारच्या बाजारपेठेत जास्त मागणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चैत्राची चाहूल लागली आणि वैशाखवणवा जाणवू लागला की ग्रामीण भागात पापड घालणे, मसाला कुटणे, लोणचे, मुरांबे घालायची लगबग सुरू होते. नामांकित कंपन्यांनी तयार केलेले रेडिमेड पापड, कुरडय़ा, सांडगे आणि शेवयाचा जमाना असला तरी आजही ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या याच पदार्थाना शहरात चांगली मागणी आहे. कारण गृहिणींनी तयार केलेल्या या पदार्थाची चव वेगळीच असते. या कुरकुरीत कुरडया, सांडगे, पापड, शेवया, लोणची, मुरंबे आदी पदार्थाच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे वसईतील दुकानदार संजीवनी यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगारही उपलब्ध होत आहे.

लोणची बनवण्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांची मोठय़ा प्रमाणावर खरेदी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यात प्रामुख्याने राजापुरी, गावरान, नीलम, तोतापुरी या आंब्यांचा समावेश असल्याचे विक्रेते आणि लोणची तयार करणाऱ्या महिलांनी सांगितले.

बाजारातील दर

गव्हाच्या कुरडया – २६० ते ३२५ रुपये शेकडा

तांदळाचे पापड – २२५ ते २५० रुपये शेकडा

साबुदाणा चकल्या – १६० ते १९० रुपये शेकडा

बटाटय़ाच्या चकल्या – १६० ते २२५ रुपये किलो

शेवया – १५५  ते २०० रुपये किलो

फ्लॅट पद्धतीमुळे वाळवणासाठी जागेची कमतरता

नोकरी आणि व्यवसायानिमित्त अनेकांना हे पदार्थ घरी बनवणे शक्य नसते. तसेच वाळवणाचे पदार्थ करण्याची पद्धत माहीत नसणे आणि ते वाळविण्यासाठी जागेची समस्या यामुळे ही कामे करणे शक्य नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. म्हणूनच ६० ते ७० टक्के महिला हे पदार्थ विकत घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे घरगुती चव देणाऱ्या लघुउद्योजकांकडून, बचत गटांकडून कुरडया, पापड, चकल्या, शेवया आदी वस्तू विकत घेतल्या जात आहेत.

अनेक महिलांना नोकरी-व्यवसायामुळे पापड आणि इतर पदार्थ घरी बनवण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे तयार पदार्थ खरेदी करण्याकडे अशा महिलांचा अधिक कल असतो. या पदार्थाच्या किमती १५ ते २० टक्क्यांनी वाढल्या असल्या तरी विक्रीवर काहीही परिणाम झालेला नाही.

– शैला, वसईतील दुकानदार

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homemade food item more demand in vasai virar market
First published on: 05-04-2017 at 03:15 IST