डोंबिवली- डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातून नांदिवली दिशेने प्रवास करताना एका महिलेच्या ५० हजार रूपये किमतीच्या महागड्या घड्याळ्याची पिशवी रिक्षेत विसरली. घरी गेल्यानंतर या महिलेला आपली घड्याळाची पिशवी रिक्षेत विसरल्याचे लक्षात आले. महिलेने तात्काळ रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला. पदाधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांना आवाहन करून विसरलेली वस्तू महिलेला परत केली.

रिक्षा चालक जगन्नाथ पवार यांनी आपल्या रिक्षेतून प्रवास केलेल्या महिला प्रवासी दीप्ती सावंत यांची रिक्षेत विसरलेली घड्याळाची पिशवी परत केली. असाच प्रसंग काही दिवसापूर्वी कल्याण रेल्वे स्थानक भागात घडला होता. डोंबिवलीतील राजाजी पथावरील एका गृहसंकुलात राहणाऱ्या प्रवाशाची पिशवी कल्याण रेल्वे स्थानकाबाहेरील एका रिक्षेत विसरली. हा प्रवासी कल्याणहून डोंबिवलीत राहत्या घरी रिक्षेने कुटुंबासह आला. एक पिशवी ते उतरण्यास विसरले. रिक्षा निघून गेल्यावर त्यांना पिशवी रिक्षेत राहिल्याचे लक्षात आले. या प्रवाशाच्या पत्नीने तात्काळ कल्याण रेल्वे स्थानक गाठले. तेथे रिक्षा चालकांनी त्यांना सहकार्य केले. ज्या रिक्षेत पिशवी विसरली होती. त्या रिक्षा चालकाची भेट घालून दिली. रिक्षेत विसरलेली पिशवी महिलेला परत केली.

काही बेशिस्त रिक्षा चालकांमुळे प्रामाणिकपणे रिक्षा चालकांना नाहक टिकेला सामोरे जावे लागेत, असे रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

डोंबिवलीतील दीप्ती सावंत पूर्व भागात रिक्षेत बसून नांदिवलीत जात होत्या. सोबत महागडे घड्याळ्याची पिशवी होती. शेवटच्या थांब्यावर उतरल्यावर त्यांना घड्या‌‌ळ विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी दत्ता माळेकर यांना संपर्क केला. ते बाहेरगावी होते. माळेकर यांनी पदाधिकारी संजय देसले यांना महिला प्रवाशाचे घड्याळ ज्या रिक्षेत विसरले असेल ते परत मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले. देसले रेल्वे स्थानक भागात आले. त्यांनी सर्व रिक्षा चालकांना ज्या रिक्षेत सावंत यांचे घड्याळ विसरले आहे. ते परत करावे, असे आवाहन केले. जगन्नाथ पवार या चालकाने सावंत यांना नांदिवली गावात सोडले होते. त्यांना रिक्षेत पाठीमागील भागात एक पिशवी असल्याचे दिसले.

देसले यांनी आवाहन करताच, पवार यांनी आपल्या रिक्षेत कोणी वस्तू विसरले का म्हणून पाहणी केली त्यांना रिक्षेच्या मागील बाजुस एक पिशवी असल्याचे दिसले. त्यांनी ती रिक्षा पदाधिकारी देसले यांच्या ताब्यात दिली. देसले यांनी तातडीने महिला प्रवासी दीप्ती सावंत यांना रिक्षा वाहनतळावर बोलविले. त्यांच्या ताब्यात विसरलेली घड्याळची पिशवी दिली. या प्रकाराने सावंत आनंदित झाल्या. त्यांनी रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना खाकी गणवेशाचा कपडा भेट दिला. दोन दिवसापूर्वी सिध्दार्थनगरमधील सम्राट मगरे या रिक्षा चालकाने एका मुलाला लुटले होते. अशा चालकांमुळे रिक्षा व्यवसाय बदनाम होतो. त्यामुळे प्रवाशांची लुटमार करणाऱ्या रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर वाहतूक, आरटीओ विभागाने कारवाई करावी म्हणून पत्र दिले जाणार आहे, असे रिक्षा संघटनेचे शेखर जोशी यांनी सांगितले.