मधमाश्या संवर्धन चळवळीचे नागरिकांना आवाहन

इमारतीच्या उंच ठिकाणी लागलेले मधमाश्यांचे पोळे पाहिल्यानंतर त्यांना हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न केले जातात. पेस्ट कंट्रोल करणारी मंडळी आग पेटवून या मधमाश्यांना अक्षरश: जाळून टाकतात. या मधमाश्यांना पळवून लावू नका, त्यांना जपा आणि त्यांच्याकडचा मध अवश्य चाखा. मधमाश्यांचे संरक्षण ही काळाची गरज आहे, असे आवाहन मधमाश्यांच्या संवर्धनासाठी काम करणारे अमित गोडसे यांनी केले आहे.

loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : शेवटी आर्थिक फटका शेतकऱ्यांनाच!
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

पर्यावरण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या ‘फर्न’ संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात मधमाशी संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या अमित गोडसे यांनी मार्गदर्शन केले. जगाच्या पाठीवरून मधमाश्या नाहीशा झाल्या तर माणूस जेमतेम चार वर्षे जगू शकेल, असे अल्बर्ट आइनस्टाईन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ देत अमितने मधमाश्यांचे महत्त्व सांगितले. पुण्यातील त्याच्या राहत्या इमारतीत असलेले मधमाश्यांचे पोळे काढताना पेस्ट कंट्रोल करणाऱ्यांनी ते पोळे जाळले होते.

त्यामुळे लाखो मेलेल्या माश्यांचा खच पडलेला पाहून अतिशय वाईट वाटले आणि त्या क्षणापासून त्यांनी मधमाश्या संवर्धनाच्या कामात स्वत:ला झोकून दिले. मध काढण्याची, मधमाश्यांना पळवून लावण्यापेक्षा कमी संहारक आणि अधिक शास्वत पद्धती असू शकते अशी त्यांची खात्री होती. त्याच अनुषंगाने त्यांनी पुण्यातील मधमाशी पालन आणि संवर्धन केंद्र तसेच खादी ग्रामोद्योगतर्फे महाबळेश्वर येथे चालवल्या जाणाऱ्या केंद्रात रीतसर प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत पुण्यात मधमाशी संवर्धनाची मोहीम हाती घेतली आहे. आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून पूर्णवेळ या कामासाठी वाहून घेणारा या तरुणाच्या मार्गदर्शनाने ठाणेकर मंडळी भारावून गेली.

मधमाश्यांना योग्य पद्धतीने हाताळा

शास्त्रीय पद्धतीत मधमाश्या जाळण्याऐवजी केवळ धुराच्या साहाय्याने त्यांना दूर करून मधाच्या भागापैकी ६०-६५ टक्के भाग काढून बाकी पोळे तसेच ठेवले जाते. यामुळे मधमाश्या मरत नाहीत, तर त्या ते पोळे दुरुस्त करून पुन्हा मध साठवतात. या पद्धतीमुळे अजून ३ ते ४ वेळा पुन्हा त्यापासून मध काढता येऊ शकतो. सामान्य लोकांना याबद्दल खूपच कमी किंवा अर्धवट माहिती आहे. त्यामुळे याविषयी मोठय़ा प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता आहे. शहरात मधमाश्यांची संख्या वाढवण्यासाठी पेटय़ा ठेवणे तसेच त्यांना उपयुक्त झाडे लावणे, हा उपाय आहे. याशिवाय शिसव, बहावा, कांचन, जांभूळ, पळस, बोर, अशा वृक्षांची लागवडदेखील आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. ठाण्यातील ‘फर्न’ संस्थादेखील या चळवळीमध्ये सहभाग झाली असून नागरिकांना जागरूक करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.