शहरबात-वसई : पर्यटकांच्या हुल्लडबाजीने पावित्र्यावर घाला

हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने अनेकदा पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या.

Hooligan tourists
हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने अनेकदा पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या.

वसईच्या किनारपट्टीवर येणारे हुल्लडबाज ग्रामस्थांची डोकेदुखी ठरत आहेत. किनाऱ्यावर गावातून जाताना धांगडधिंगा करणे, बेदरकारपणे वाहने चालवणे, अश्लील कृत्य करणे आदी प्रकार हुल्लडबाजांकडून होत असतात. यामुळे गावाची शांतता भंग पावतेच, शिवाय संस्कृतीचेही अध:पतन होऊ  लागले आहे. अशा हुल्लडबाजांविरोधात ग्रामस्थच रस्त्यावर उतरले आहेत.

मुंबई आणि परिसराच्या जवळ असलेले वसई म्हणजे एका दिवसाच्या सहलीसाठी उत्तम ठिकाण. ट्रेन आणि वाहनांची सोय असल्याने येथे पोहोचणेही सोपे जाते. निर्सगरम्य पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या वसईत समुद्राच्या सान्निध्यात शेकडो रिसॉर्ट्स उभी राहिली आहेत. येथे मजामस्ती करण्यासाठी मुंबई आणि परिसरातून पर्यटक येत असतात. अर्नाळा, राजोडी, कळंब, नवापूर, रानगाव, सुरूची बाग आदी समुद्रकिनारे पर्यटकांची हक्काची ठिकाणे आहेत. किनाऱ्यावर फिरण्यासाठी, रिसॉर्टमध्ये मौजमस्ती करण्यासाठी पर्यटक येत असतात. त्याशिवाय येथे असलेल्या अनेक लॉजेसमध्ये प्रेमी युगुले येत असतात. येथील किनाऱ्यावर असलेला शांतपणा, खासगीपणा आणि सुरक्षितता मुंबईत मिळत नाही. त्यामुळे वसईचे किनारे पर्यटकांना नंदनवन वाटतात. पण काही लोक याचाच गैरफायदा घेतात. या किनाऱ्यावर जाण्याचा रस्ता हा गावातून जातो. समूहाने येणारे लोक रिक्षातून दाटावाटीने गर्दी करून येत असतात. येताना आरडाओरड करणे, बीभत्स हालचाली करणे, टिंगलटवाळी करणे, मद्यपान करणे असे प्रकार करत ते गावातून जात असतात. फिरायला आल्यावर सार्वजनिक मालमत्ता आपलीच आहे आणि वाटेल तसे वागण्याचा आपल्याला परवाना मिळालेला आहे अशा आविर्भावात ते वागत असतात. शांत गावातून आपण जातोय, आपल्या वागणुकीचा ग्रामस्थांना त्रास होत असेल याचा जराही विचार हे लोक करत नाहीत. रिक्षा आणि खासगी वाहनांतच ते मद्यपान करत असतात, त्यामुळे भररस्त्यात त्यांचा धांगडधिंगा सुरू असतो. वाहनातील संगीत कर्णकर्कश आवाजात सुरू असते. वाहने भरधाव वेगात असतात, त्यामुळे गावातील निमुळत्या रस्त्यांवर अपघाताचीही शक्यता असते. दुपारच्या वेळी गावातील शांतता भंग होते. वाहनातून पाकीटबंद खाद्यपदार्थाची पाकिटे, बाटल्या रस्त्यावर फेकत असतात. वाहनातच जोडप्यांची अश्लील कृत्ये सुरू असतात. दुचाकीवरून येणारी जोडपीही अश्लील कृत्य करत येत असतात. अशा हुल्लडबाजांमुळे ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचे पावित्र्यदेखील नष्ट होत असते. वसईच्या किल्लय़ात येणारेदेखील मद्यपान करत असतात. किल्लय़ात स्वच्छता मोहीम सामाजिक संघटनांनी घेतली तर हजारो मद्याच्या बाटल्या आढळून येतात. समुद्रात आणि नदीत बुडून पर्यटक मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्येदेखील वाढ होत आहे. हे सर्व प्रकार रोखण्यास प्रशासन अपयशी ठरत आहे.

या हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने अनेकदा पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र काहीच कारवाई झाली नाही. राजोडी येथे तर काही महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी फलक लावून हुल्लडबाज पर्यटकांना इशारा दिला होता. कुणी अश्लील चाळे आणि गैरप्रकार करत असेल तर ग्रामस्थांकडून अशा लोकांना चोप दिला जाईल, असा जाहीर फलकही नाक्यावर लावण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांच्या संयमाचा बांध सुटला. रिसॉर्टमध्ये अश्लील चाळे करत जाणारे जोडपे आणि हुल्लडबाज मद्यपींना ग्रामस्थांनी एका रविवारी जोरदार दणका दिला. महिलांनी रस्त्यावर जमून अशा हुल्लडबाजांना नेणाऱ्या रिक्षा रोखून धरत रास्ता रोको आंदोलन केले. त्यांच्या हुल्लडबाजीचा त्रास सहन न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी वटार गावातील दोन तलाव येथे हुल्लडबाजांच्या रिक्षा अडवून रास्ता रोको केला होता. महिलांनी या रिक्षाचालक आणि मद्यपींना चांगलेच खडसावले. या वेळी अर्नाळा सागरी पोलीस आणि वाहतूक पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी घेऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर सर्व संबंधित यंत्रणांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे ही बैठक झाली आणि हुल्लडबाजांच्या उपद्रवाचा पाढाच पोलिसांसमोर मांडण्यात आला. या रिसॉर्ट संस्कृतीमुळे गावातील संस्कृती बिघडत चालली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तोकडय़ा कपडय़ांतील मुली अश्लील चाळे करत गावातून जात असतात. त्याचा गावातील कोवळ्या मुलांवर परिणाम होत असतो. मद्यपी पर्यटक तर

हैदोस घालत असतात, असे महिलांनी पोलिसांना सांगितले.

यानंतर हुल्लडबाज पर्यटकांना वठणीवर आणण्यासाठी पोलिसांनी नियमावली तयार केली आहे. प्रियकरासोबत स्कार्फ बांधून येणाऱ्या तरुणींना स्कार्फ बंदी घालण्यात आली आहे. तर रस्त्यात अश्लील चाळे करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मद्यपी पर्यटकांना रोखण्यासाठी तपासणी नाके उभारले जाणार असून अनधिकृत रिक्षा हटविल्या जाणार आहेत. तरुणी दुचाकी तसेच रिक्षातून येतात. त्यांनी ओळख कळू नये यासाठी चेहऱ्यावर स्कार्फ लावलेला असतो. परंतु त्यांचे अश्लील चाळे रिक्षात आणि रस्त्यात सुरू असतात. त्यामुळे यापुढे इथे येणाऱ्या कुठल्याही तरुणीला चेहऱ्यावर स्कार्फ लावता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. रस्त्यात अश्लील चाळे करणारी जोडपी आढळली तर ग्रामस्थांनी तक्रार करावी, त्यांच्यावर मुंबई पोलीस अ‍ॅक्टच्या कलम ११२ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यात मद्यपान करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकाची मदत घेतली जाणार आहे. ही मॉरल पोलिसिंग नसून पर्यटकांना शिस्त लागावी, स्थानिकांना त्रास होऊ  नये म्हणून हे नियम लागू केल्याचे पोलिसांनी सांगितले.

येथे येणारे पर्यटक हे रिक्षातून येत असतात. रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असतात. यापुढे सर्व रिक्षांची तपासणी केली जाणार आहे. अनधिकृत रिक्षा येथून हटविल्या जाणार आहे. जास्त प्रवासी आढळले तर त्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाणार आहे. पर्यटकांच्या तपासणीसाठी तपासणी नाके उभारले जाणार आहेत. सुट्टीच्या दिवशी गावातून न जाता मुख्य रस्त्याने रिक्षा न्यावी लागणार आहे. रिक्षा आणि लॉजचालकांचे साटेलोटे असतात. तेच जोडप्यांना घेऊन लॉजमध्ये येतात आणि त्यांना कमिशन मिळते. अशा रिक्षाचालकांवरदेखील पोलीस कायद्याचा बडगा उगारणार आहेत. हुल्लडबाजी करणारे पर्यटक दिसले तर त्यांची सूचना स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्याच्या सूचना ग्रामस्थांना करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी तयार केलेल्या पोलीस मित्रांनाही किनाऱ्यावर लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विविध सामाजिक संस्थांना याबाबत जनजागृती करण्याविषयी पोलिसांतर्फे विनंती केली जाणार आहे. पावसाळ्यात वसईच्या विविध किनाऱ्यांवर पर्यटक मोठय़ा संख्येने येत असतात. मात्र समुद्रात जाऊन अनेकांचा बुडून मृत्यू होत असतो. पोलीस आणि ग्रामस्थांनी या वर्षी संयुक्त मोहीम उघडून पर्यटकांना समुद्रात जाण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

हुल्लडबाजांचा हा उपद्रव सुसंस्कृत वसईला काळिमा फासणारा आहे. आपण ज्या निसर्गात जातो, ज्या ऐतिहासिक वास्तूत जातो त्याचे पावित्र्य जपणे, आदर करणे हे प्रत्येकाचे काम आहे. कायद्याने अशा नैतिक गोष्टी शिकवायला लागणे हेच क्लेषदायक आहे. पोलीस दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वागतात का आणि हुल्लडबाजांना वठणीवर आणतात का, ते लवकरच कळेल.

सुहास बिऱ्हाडे

@suhas_News

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hooligan tourists creating headaches for villagers in vasai

ताज्या बातम्या