बदलापुरातील वृद्ध कलाकार दाम्पत्याची उदरनिर्वाहासाठी धडपड; कवडीमोल किमतीत वस्तूंची विक्री

बदलापूर : ठाण्यासारख्या शहरातून आपल्या हक्काचे घर सोडावे लागलेले एक वृद्ध कलाकार दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून बदलापुरात आपल्या लाकडी कलाकुसरीतून जगण्याची आशा टिकवून आहेत. आपल्या नातवंडांना खेळवण्याच्या वयात हे दाम्पत्य आपल्या आजारी मुलाचा सांभाळ करत आहेत. चित्रकार पत्नीच्या मदतीने आनंद पवार या कलाकाराने शेकडो लाकडी कलाकृती तयार केल्या आहेत. मात्र उदरनिर्वाह हा एकमेव उद्देश असल्याने कवडीमोल दरात त्यांना या कलाकृती विकाव्या लागल्या. किमान आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात तरी अनेक दशकांच्या या कला साधनेचा सन्मान व्हावा आणि त्याचे मोल व्हावे हीच या वृद्ध कलावंताची अपेक्षा आहे.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
Indian Railway Recruitment 2024 RRB RPF Notification 2024
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी रेल्वे विभागाकडून मेगा भरती, कुठे करायचा अर्ज? पगार किती? जाणून घ्या
bmc will take permission from ec for potholes filling
मुंबई: खड्डे भरण्याच्या कामासाठीही निवडणूक आयोगाची परवानगी घेणार; पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करणार
Online Betting
सट्टेबाजीत दीड कोटींचं नुकसान, कर्जाच्या वसुलीसाठी धमक्या; पत्नीने उचललं टोकाचं पाऊल!

ठाण्यात पाटलीपाडा भागात राहणारे आनंद पवार एका कंपनीत खासगी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. लहानपणापासून लाकडी वस्तू बनवण्याची कला त्यांना अवगत होती. फावल्या वेळेतही त्यांनी ती कला जोपासली आणि वाढवली. उतरत्या वयात छंद म्हणून ठेवावी अशी हीच कला आता त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली आहे. काही वर्षांपूर्वी पाटलीपाडा भागात फसलेल्या घराच्या व्यवहारात आपले घर सोडावे लागल्याने आनंद पवार यांच्या तरुण मुलाने धसका घेत अंथरूण पकडले. सध्या पंचाहत्तरीत असलेले आनंद पवार आणि साठी ओलांडलेली त्यांची पत्नी माया पवार आपल्या कला जोपासत दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडवत आहेत.

बदलापुरात एका भाडय़ाच्या जागेत राहणारे हे दाम्पत्य आपल्या २३ वर्षीय मुलाची देखरेख करतात. विवाहित मुलगी आणि जावई यांच्या मदतीवर त्यांची काही प्रमाणात गुजराण होते. मात्र स्वत:च्या कलेतून चार पैसे मिळावेत अशी आनंद पवार यांची आशा असते. त्यामुळे आनंद पवार गेल्या काही वर्षांपासून विविध लाकडी कलाकृती तयार करतात. पटाशी, छोटी करवत, कानस आणि हातोडी या चार हत्यारांच्या मदतीने लाकडी घरे, झोपडय़ा, पक्षी, प्राणी, विविध लाकडी आकार, महल, जहाज, रथ, मंदिर अशा शेकडो कलाकृती पवार यांनी साकारल्या आहेत. चंदन, शिसम आणि देवधर या अधिक काळ टिकणाऱ्या महागडय़ा लाकडांचा वापर आग्रहाने करतो, असे पवार सांगतात.

‘ग्राहकांना कलेची जाण नाही’

राज्याच्या शासनाच्या खादी ग्रामोद्योग विभागाच्या प्रदर्शनांसह अनेक प्रदर्शनांमध्ये त्यांच्या या कलाकुसरीने वाहवा मिळवली आहे. मात्र ग्राहकांना कलेची जाण नाही, अशी खंत आनंद पवार व्यक्त करतात. लाकडी कलाकुसर करण्यासाठी किमान एक दिवस ते कमाल एक महिन्याचा कालावधी लागतो. त्यासाठी खूप बारकाईने काम करावे लागते. लाकडात जोडणी करणे अशक्य असते. त्यामुळे एकाच लाकडात सुटे भाग तयार करावे लागतात. मात्र कलेला त्या तुलनेत मोल मिळत नाही. उदरनिर्वाहासाठी अगदी कवडीमोल किमतीत बदलापूर शहरात वस्तू विकल्या आहेत, असे पवार सांगतात. उतारवयात ही कला आम्हाला जगवते आहे. मात्र आता या कलेला स्वीकारून तिचे मोल वाढवण्याची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी, अशी पवार दाम्पत्यांची भावना आहे.