तेलवाहू टँकरच्या अपघातानंतर घोडबंदर ठप्प; ठाण्यासह अन्य शहरांतील वाहतुकीचा बोऱ्या

ठाणे : चाळण झालेल्या रस्त्यांवरून मार्गक्रमण करताना होत असलेल्या वाहतूक कोंडीने वाहनचालकांचे कंबरडे मोडले असताना रविवारी रात्री तेलवाहू टँकरच्या अपघाताने या कोंडीत तेल ओतले. घोडबंदर येथील गायमुख भागात या टँकरची चार वाहनांना धडक बसल्यानंतर त्यातील तेल रस्त्यावर पसरल्याने गायमुख ते पूर्व द्रुतगती मार्गावरील नितीन कंपनीपर्यंत तसेच ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर गायमुख ते चिंचोटी फाटा आणि फाऊंटन उपाहारगृहापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याचा परिणाम ठाणे, वसई, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबईच्या वाहतुकीवर सोमवारी दिवसभर दिसून आला.

या वाहतूक कोंडीमुळे मुंबई-नाशिक महामार्ग पूर्णपणे कोंडला गेला होता. याखेरीज ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही प्रचंड वाहतूक कोंडी होती. कोंडीत अडकल्यामुळे ठाणे स्थानकात एसटी, टीएमटी बस तसेच रिक्षा उपलब्ध होत नव्हत्या. परिणामी सकाळी कामासाठी घराबाहेर पडलेल्यांचे हाल झाले. अनेक ठिकाणी रुग्णवाहिकाही कोंडीत अडकल्याचे दिसून आले.

  घोडबंदर येथून ठाण्याच्या दिशेने येत असलेला हा टँकर गायमुख येथे आला असता, चालकाचा ताबा सुटल्याने तो समोरून येणाऱ्या तीन कार आणि ट्रकला धडकला. त्यामुळे टँकरमधून तेलगळती होऊन तेल रस्त्यावर पसरले. जवळपास ८० मीटर रस्त्यावर हे तेल पसरले. वाहतूक पोलिसांनी हायड्राच्या मदतीने टँकरला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यास दोन तासांहून अधिकचा कालावधी लागला. तोपर्यंत येथील वाहतूक रोखून धरण्यात आली होती. त्यामुळे मध्यरात्री वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. रस्त्यावरून टँकर काढल्यानंतर दोन्ही मार्गिकेवर सांडलेल्या तेलाच्या थरावर माती टाकण्यात येणार होती. मात्र, इतक्या मोठय़ा प्रमाणात माती उपलब्ध होण्यासाठी पहाटे पाच वाजले. त्यानंतर या रस्त्यावर माती टाकली गेली. त्यानंतर वाहतूक सुरू झाली असली तरी सोमवारी दुपारी तीननंतरही वाहतुकीचा खेळखंडोबा सुरूच होता.  घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर गायमुख ते चिंचोटी फाटा व फाऊंटन उपाहारगृहापर्यंत रांगा लागल्या होत्या. अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेनेही वाहने चालवीत होते. त्यामुळे माजीवडा, कापूरबावडी, मानपाडा येथेही वाहतूक कोंडी झाली होती. तर, ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरही नितीन कंपनीपर्यंत रांगा लागल्या होत्या. घोडबंदर मार्ग कोंडल्याने मुंब्रा बाह्यवळण मार्गे, भिवंडी आणि नाशिकमार्गे ठाणे, घोडबंदरच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवरही त्याचा परिणाम जाणवला.

बस, रिक्षासाठी रांगा

वाहतूक कोंडीमुळे एसटी, टीएमटी बसगाडय़ा आणि रिक्षा जागेवरच थांबून होत्या. त्यामुळे मुंबई, ठाण्यात कामानिमित्ताने जाणाऱ्या काही प्रवाशांनी एसटी, टीएमटी बसगाडय़ा आणि रिक्षातील प्रवास अर्धवट सोडून पायी चालत जाण्यास प्राधान्य दिले. काहींनी चालतच घरचा रस्ता धरला. तर ठाण्यात कार्यालये असलेल्या नागरिकांनी चालत कार्यालये गाठली. ठाणे स्थानक परिसरातील रिक्षा थांबा, एसटी आणि टीएमटी बस थांब्यावर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या.