ग्रामीण सरकारी रुग्णालयात विविध आजारांचे निदान २० ते २५० रुपयांमध्ये

भगवान मंडलिक

कल्याण: करोनाकाळातील विदारक अनुभव लक्षात घेता येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाल्याने या ठिकाणी विविध प्रकारच्या २३ व्याधींच्या तपासण्या करणारी अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.  यात विविध आजारांचे निदान २० ते २५० रुपयांमध्ये होणार आहेत.

शहापूर उपजिल्हा रुग्णालयात यापूर्वी चाचणी प्रयोगशाळा होती. येथे मोजक्याच चाचण्या केल्या जात होत्या. त्यामुळे अनेक चाचण्यांसाठी रुग्णांना ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे शहरात जावे लागत होते. रुग्णांची होणारी परवड विचारात घेऊन शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळा अद्ययावत करण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला. २३ विविध प्रकारच्या रुग्ण चाचण्या, तपासण्या, त्यांचे डिजिटल पद्धतीने अहवाल देण्याची व्यवस्था प्रयोगशाळेत करण्यात आली आहे.

प्रयोगशाळेत आल्यावर रुग्णासाठी आसनव्यवस्था, रांगेची व्यवस्था, नोंदणी कक्ष, प्रक्रिया कक्ष, विश्राम कक्ष, वाचनासाठी वर्तमानपत्र, रुग्ण तपासणीनंतर त्याला काही वेळ देखरेखीखाली ठेवण्यासाठी विश्रांती कक्ष, डिजिटल अहवाल कक्षाची सोय आहे. सीसीटीव्ही नियंत्रणाखाली ही प्रयोगशाळा आहे. स्वयंचलित दरवाजे, प्रत्येक कक्ष वातानुकलित अशी व्यवस्था येथे आहे, असे शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अजय क्षीरसागर यांनी सांगितले.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश म्हस्के, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अजय क्षीरसागर, मुकुंद कालुशे, प्रज्ञा जगताप, उमेश पाटील, गीता शिंदे, सुचिता कोल्हे, योगेश भेरे, तुषार चोपदार, नरेश जुहूकर, संदीप लोटे यांनी मेहनत घेऊन प्रयोगशाळा उभी केली आहे.

नि:शुल्क सेवा कोणाला?

पिवळी शिधापत्रिका, ज्येष्ठ नागरिक, आश्रमशाळा रुग्ण, गरोदर माता, अधिस्वीकृतीधारक पत्रकार यांना नि:शुल्क सेवा उपलब्ध असेल.

शहापूर तालुक्यात आदिवासी, दुर्गम भाग मोठा आहे. या भागातील रहिवासी, रुग्णांना स्थानिक पातळीवर वैद्यकीय चाचण्यांची सुविधा मिळाली पाहिजे. चाचणीसाठी रुग्णांना इतर शहरात जाण्याची गरज वाटता कामा नये. या विचारातून शहापूर उपजिल्हा रुग्णालयात अद्ययावत प्रयोगशाळेची उभारणी केली आहे.

अजय क्षीरसागर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, शहापूर उपजिल्हा रुग्णालय.