गेल्या आठवडय़ात एका खाजगी रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असलेल्या महिलेच्या हातातील सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी रुग्णालयातीलच दोन महिला परिचारिका आणि पुरुष कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली असून यामुळे या चोरीप्रकरणी रुग्णालयातीलच व्यक्तींना अटक झाल्याने एकच खळबळ माजली आहे.
अंबरनाथमधील लक्ष्मी शांताराम आंग्रे या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अंबरनाथ शहरातील बीजांकुर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी लक्ष्मीबाई यांच्या अंगावरील दागिने रुग्णालय प्रशासनाने काढून घेतले होते. मात्र त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगडय़ा हातातून निघत नसल्याने त्या हातातच ठेवल्या होत्या. त्यानंतर लक्ष्मीबाईना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले होते. मात्र उपचारानंतर लक्ष्मीबाई शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या हातातील सोन्याची ३२ हजार रुपयांची ही बांगडी नसल्याने त्यांनी आपल्या मुलाला सांगितले. हॉस्पिटल प्रशासनाला याबाबत जाब विचारल्यानंतरही रुग्णालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याने या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाअंती प्रियांका प्रकाश कांबळे आणि भारती मंगळ भाग्यवंत या दोन परिचारिका आणि बंटी बर्मन या पुरुष कर्मचाऱ्याला अटक केली आहे. दरम्यान अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.