scorecardresearch

परिचारिकांचे आंदोलन

महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून ९० परिचारिकांर्ची संख्या कमी असून यामुळे इतर परिचारिकांवर कामाचा ताण वाढत आहे.

कळवा रुग्णालयात मनुष्यबळ वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी

ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून ९० परिचारिकांर्ची संख्या कमी असून यामुळे इतर परिचारिकांवर कामाचा ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर परिचारिकांनी रुग्णालयाच्या आवारातच सोमवारी ठिय्या आंदोलन करत परिचारिकांच्या भरतीसंबंधीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी केली. भरती प्रस्तावाबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाहीतर परिचारिकांकडून काम बंद होण्याची शक्यता असून असे झाल्यास रुग्णाचे हाल होण्याची शक्यता आहे.

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतत. ठाणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून हे रुग्ण येतात. पालघर जिल्ह्यातूनही रुग्ण येथे येतात. याशिवाय, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय करोना रुग्णालय असल्यामुळे येथे इतर उपचारांची सुविधा बंद असून यामुळे या रुग्णांचा भारही कळवा रुग्णालयावर वाढला आहे. या रुग्णालयात एकूण २१७ परिचारिकांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र १२७ परिचारिका आहेत. उर्वरित काही परिचारीका कंत्राटी पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. त्या पगार कमी मिळत असल्याने दुसरीकडे निघून गेल्या तर काही परिचारिका सेवानिवृत्त झाल्या आहेत. काही परिचारिकांनी कामाचा ताण वाढला म्हणून निवृत्ती घेतली आहे. ९० परिचारिका कमी असल्यामुळे त्याचा भार १२७ परिचारिकांवर गेल्या दोन वर्षांपासून येत आहे. परिचारिकांनी करोना काळात कोणत्याही तक्रारीविना कामे केली. तसेच या काळात सुट्टय़ाही घेतल्या नाहीत. ९० रिक्त जागांवर परिचारिका नेमण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. यामुळे कामाचा वाढलेला ताण कमी होईल अशी परिचारिकांना आशा होती. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेतच आहे. यामुळे परिचारिकांनी रुग्णालयाच्या आवारातच सोमवारी ठिय्या आंदोलन करत परिचारिकांच्या भरतीसंबंधीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी केली, अशी माहिती परिचारिकांनी दिली. सकाळच्या शिफ्टच्या परिचारिकांमार्फत रुग्णालयात काम सुरु असून दुपारच्या शिफ्टमधील परिचारिकांमार्फत हे आंदोलन करण्यात आले. यामुळे रुग्णालयातील काम बंद केलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘लवकरच मंजुरी’

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात परिचारिकांची संख्या कमी असून हे संख्याबळ वाढविण्याची मागणी परिचारिकांकडून करण्यात आली. त्यांनी कोणत्याही विभागाचे काम बंद ठेवलेले नाही. तसेच संख्याबळ वाढविण्याचा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर अंतिम टप्प्यात असून तो लवकरच मंजूर होईल, असे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hospital manpower movement nurses ysh

ताज्या बातम्या