सध्या प्रत्येक जण अगदी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. पाऊस पडल्यावर वातावरणात हवाहवासा वाटणारा गारवा येतो आणि गरमागरम भजी आणि वडापाव खावासा वाटू लागते. अशा कुंद वातावरणात काहींची पावले पूर्वेकडच्या कोपरी येथे असलेल्या छोले पॅटिसकडे वळतात. गरम पॅटिसवर चमचमीत छोले, चवीला थोडा कांदा आणि चटणी हे वर्णन ऐकल्यानंतरच आपल्या तोंडाला पाणी सुटते. कोपरी येथील साईकृष्णा उपाहारगृहामध्ये असे वेगळ्या चवीचे पदार्थ मिळतात. भेळ, शेवपुरी यांच्या पंक्तीत बसणारा एक प्रकार म्हणजे रगडा पॅटिस. तसे पाहिले तर रगडा पॅटिस तर सगळीकडेच अगदी सहज उपलब्ध असते. मात्र येथील रगडा पॅटिस खाल्ल्यानंतर जिभेवर त्याची चव दीर्घकाळ रेंगाळत राहते आणि पुन:पुन्हा ‘साईकृष्णा’ला भेट द्यावीशी वाटते.

३० वर्षांपूर्वी गोविंद दास यांनी या दुकानात भजी-पाव विकण्यास सुरुवात केली. सध्या त्यांची मुले तपन दास व जयंत दास हा व्यवसाय सांभाळतात. मात्र ठाणेकरांच्या जिभेवर मात्र ४० वर्षे तीच चव रेंगाळत राहिली आहे. दासबंधूंच्या छोले पॅटिसला खास बंगाली चव आहे. हे दोन्ही बंधूपॅटिस स्वत: तयार करतात. घरीच मसाले दळत असल्याने चवीत जराही फरक पडलेला नाही. पहाटे पाच वाजल्यापासून ते तयारी सुरू करतात. नऊ वाजता मसाला तयार होतो. त्यानंतर दुकान सुरू होते. संध्याकाळी साडेसातपर्यंत त्यांचे सर्व पॅटिस, समोसे संपतात. रगडा छोलेला विशेष मागणी असते. मात्र दासबंधू सांगतात, जिभेला जरी खावेसे वाटले तरी एका प्लेटमध्येच पोट भरून जाते. त्यामुळे दुसरी घेतलेली प्लेट पूर्ण संपत नाही. बसायची काही सोय नसल्याने खाद्यपदार्थ उभ्या उभ्या खावे लागतात. वडापाव तर आपण अनेक ठिकाणी खातो, मात्र येथील वडाछोले खाल्ल्यानंतर महाराष्ट्रीय वडा, पंजाबचे छोले आणि बंगाली मसाल्याची पदार्थाला असलेली चव अप्रतिम असते. मिटक्या मारून खाणे म्हणजे काय हे येथे पाहायला मिळते. छोल्यांमध्ये पावाचे तुकडे टाकून भाजले की छोला डबल नावाची चमचमीत डिश तयार होते. छोला डबलची एक प्लेट खाल्ली की पोट भरते. कोपरीतील अनेक घरांत सायंकाळी छोला डबल खाणे हे रात्रीचे जेवण असते. दासबंधू हे जरी बंगाली असले तरी उत्तम मराठी बोलतात. महाराष्ट्रीय नागरिकांनी खूप साथ दिल्यामुळे इतकी वर्षे व्यवसाय करू शकलो, हे दासबंधू आवर्जून नमूद करतात. येथे गेली चार दशके नियमितपणे येणारे अनेक ग्राहक आहेत.

सुट्टीच्या दिवशी येथे खूप गर्दी असते. दिवसाला ३० किलो रगडा अगदी सहज संपतो असे त्यांनी सांगितले. पंजाबी नागरिकांना रगडा सोमासा खावयास अधिक आवडतो. त्यामुळे गोड चटणी, एक समोसा आणि त्यावर गरमागरम छोले टाकल्यानंतर हा समोसा कधी एकदा खातो असे होते आणि गरम असला तरी फुंकर मारत मारत खाण्याचा मोह आवरता येत नाही. पूर्वी २० रुपयांना मिळणारी छोले पॅटिसची डिश आता २४ रुपयांना मिळते. वडापाव मात्र दहा रुपयांना मिळतो. वाढदिवस तसेच आपल्या आनंदाच्या क्षणी ठाणेकर खवय्ये आवर्जून दासबंधूंना ऑर्डर देतात. आजी-आजोबांबरोबर काही बच्चे कंपनीही या पदार्थाची चव चाखण्यास येतात. ग्राहकांची दिलखुलास दाद ही मोठी पोचपावती असल्याचे जयंत दास यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर दुकानात गर्दी असल्यास गाडी बाजूला लावून ‘काका पार्सल द्या, घरी जाऊन खातो’ अशी फर्माईश करणारेही खवय्ये आहेत. छोले पॅटिसची कीर्ती ऐकून अनेक खवय्ये मुंबईहूनही खास छोला समोसा, छोला डबल खाण्यासाठी येत असतात. रविवारी उपाहारगृह बंद असते. मात्र अनेक वेळा कृपया बनवून द्या अशी मागणी येत असल्याचे दासबंधू अभिमानाने सांगतात.

  • कुठे – साईकृष्णा उपाहारगृह, भारत शाळेसमोर, कोपरी ठाणे (पू.).
  • कधी – दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत.