डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागात राहत असलेल्या एका हाॅटेलच्या मालकाला गुरुवारी रात्री एका ग्राहकाने रागाच्या भरात बांबुने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत हाॅटेल मालकाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. हाॅटेल मालकाने या मारहाण प्रकरणी ग्राहका विरुध्द तक्रार विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.योगित विश्वनाथ शेट्टी (३६) असे हाॅटेल मालकाचे नाव आहे. ते डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागात कुटुंबीयांसह राहतात. त्यांचे डोंबिवलीत तुलसा नावाने हाॅटेल आहे. शेट्टी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ग्राहक दिलीप भोईर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करून घेतला आहे.

विष्णुनगर पोलीस ठाण्यातील तक्रारीत हाॅटेल मालक योगित शेट्टी यांनी म्हटले आहे, की गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान आपल्या तुलसा हाॅटेलमध्ये दिलीप भोईर आणि त्यांचे मित्र भोजनासाठी आले होते. भोजन सुरू असताना दिलीप भोईर यांच्या मित्राला लघुशंका आली. लघुशंकेसाठी ग्राहक भोईर यांचा मित्र हाॅटेलमधील स्वच्छतागृहात गेला. पण तेथे घाण असल्याने त्यांंनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. आणि तेथे लघुशंका न करता ते माघारी आले. हाॅटेलमध्ये न थांबता ते बाहेर लघुशंका करण्यासाठी निघून गेले. याविषयी हाॅटेल मालकाने नाराजी व्यक्त केली.

या विषयावरून हाॅटेल मालक योगित शेट्टी यांंनी ग्राहक दिलीप भोईर यांना उद्देशून म्हणाले, ‘काय तुमच्या मित्राला लघुशंका कोठे करावी हे समजत नाही का’. त्यानंतर हाॅटेल मालक शेट्टी आणि भोईर यांच्यात वाद झाला. शाब्दिक बोलाचालीचे रूपांतर भांडणात झाले. यावेळी भोईर यांनी हाॅटेल बाहेर उभ्या असलेल्या आपल्या स्विफ्ट वाहनातून लाकडी बांबू काढला. ते घेऊन ते हाॅटेलमध्ये आले. त्यांनी आपल्या आपल्या उजव्या डोळ्याच्यावर बांबुने फटका मारल्याने डोळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला, असे हाॅटेल मालक शेट्टी यांनी तक्रारीत म्हटले आहे. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोळंके याप्रकरणाचा तपास करत आहेत.