मागील आठवड्या पासून डोंबिवली शहराच्या विविध भागात बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील किमती ऐवज चोरुन नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. विविध ठिकाणच्या घरांमध्ये केलेल्या चोऱ्यांमधून चोरट्यांनी सुमारे १० लाखाहून अधिक किमतीचा सोन्याचा ऐवज, रोख रक्कम चोरुन नेली आहे.डोंबिवलीतील बहुतांशी वर्ग हा नोकरदार आहे. या वर्गामध्ये या चोरीच्या प्रकारामुळे अस्वस्थता पसरली आहे. बहुतांशी चोर हे डोंबिवली परिसरातील बेकायदा चाळी, झोपडपट्ट्यांमधील असण्याचा संशय पोलिसांना आहे.
हेही वाचा >>>श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन चर्चेत, राष्ट्रवादीचा तीव्र आक्षेप; म्हणे, “डीजींना विनंती आहे की…”!




डोंबिवली पूर्व भागातील नामदेव पथ रस्त्यावरील शांती निवास इमारतीत राहणाऱ्या दर्शन सावंत या व्यावसायिकाच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी व्यवसायाच्या माध्यमातून मिळालेली ५ लाख ८३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि दर्शन यांच्या आईचे सोन्याचे दागिने चोरुन केले. सावंत कुटुंबीय बाहेर गावी गेल्याने त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. या संधीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी लाखो रुपयांची रक्कम चोरुन नेली. टिळकनगर पोलीस ठाण्यात दर्शन यांनी तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
डोंबिवली पश्चिमेतील चिंचोलीचा पाडा येथील पालिकेच्या अग्निशमन दल इमारती समोरील गुलाब एकनाथ इमारतीत राहणाऱ्या श्वेता आयरे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा दुपारच्या वेळेत तोडून चोरट्यांनी ७० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरुन नेला. विष्णुनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली आहे.डोंबिवली पूर्व भागातील न्यू आयरे रस्त्यावरील नवकृष्णाई इमारतीत राहणाऱ्या संदीप सोनावणे या नोकरदाराच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरातील सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. रामनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली आहे.कासारिओ पलावा येथे राहणाऱ्या अब्दुल शेख या वास्तुविशारदाच्या बंद घराच्या खिडक्यांचे कुलुप तोडून घरात प्रवेश करुन चोरट्यांनी रविवारी रात्री २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोऱट्यांनी चोरुन नेले. मानपाडा पोलीस ठाण्यात शेख यांनी तक्रार केली आहे.
हेही वाचा >>>विश्लेषण: नवीन ठाण्याची निर्मिती लवकरच? काय असेल हा प्रकल्प?
घरफोड्या अटक
पूर्व भागातील दत्तनगर मध्ये राहणाऱ्या श्रध्दा म्हाप्रळकर यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ७० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. रामनगर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करुन सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रिकरणातून याच भागातील संगितावाडी मधील झोपडपट्टीत राहणाऱ्या किसन अशोक कारले (२८) या चोरट्याला अटक केली आहे. चोरीचा ऐवज पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केला. डोंबिवलीतील चोऱ्या या आरोपीनेच केल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.