महापालिका क्षेत्रातील झोपडपट्या आणि चाळींंच्या परिसरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढिग साचू नयेत तसेच नाल्यामध्ये कचरा फेकला जाऊ नये यासाठी घनकचरा विभागाने घरोघरी कचरा संकलन योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून एकूण ६३ बचत गटांच्या मदतीने ६३० कर्मचारी सुमारे दोन लाख घरांमधून कचरा उचलणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून दररोज १०० टन कचरा उचलला जाणार आहे. या योजनेचे काम येत्या दहा दिवसांत सुरु होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

ठाणे शहर सुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्प राबविले जात असतानाच दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचत असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त डाॅ. विपीन शर्मा यांना कोपरी परिसरातील पाहाणी दौऱ्यादरम्यान कचऱ्याचे ढिग दिसून आले होते. त्यांनी या संदर्भात ठोस उपाययोजना कऱण्याचे आदेश घनकचरा विभागाला दिले होते. त्यानुसार या विभागाने घरोघरी कचरा संकलन योजना आखली आहे. महापालिका क्षेत्रातील झोपडपट्या आणि चाळींंच्या परिसरात घंटागाडी कचरा संकलानासाठी जाते. मात्र, ही गाडी आल्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे अनेक जण गाडी निघून गेल्यावर रस्त्यावर कचरा फेकतात. यामुळे शहरात कचऱ्याचे ढिग दिसून येतात. तर काही नागरिक घराजवळील नाल्यात कचरा फेकतात. असे प्रकार रोखण्यासाठी घरोघरी कचरा संकलन योजना आखल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

ठाणे महापालिका घनकचरा विभागाकडे मोठय़ा ११० तर छोटय़ा ७७ घंटागाडय़ा आहेत. याशिवाय, २८ कॉम्पेक्टर वाहने आहेत. या वाहनांवर सुमारे ४०० कामगार काम करतात.
पालिका आता ५० छोटय़ा घंटागाडय़ा घेणार असून त्याचबरोबर घरोघरी कचरा जमा करण्यासाठी कचरा वेचक नेमणार आहेत. हे कचरा वेचक कचरा गोळा करून छोटय़ा घंटागाडीमध्ये तो टाकणार आहेत. सकाळ, दुपार आणि रात्र अशा तीन वेळांत कचरा उचलण्याचे काम केले जाणार आहे. कचरा गोळा करण्यासाठी ३०० कुटुंबांमागे एक कर्मचारी नेमला जाणार आहे, अशा स्वरूपाचा हा प्रस्ताव आहे. या कामासाठी ५४३ अर्ज पालिकेला प्राप्त झाले असून त्यापैकी एकूण ६३ बचत गटांना हे काम देण्यात येणार आहे, या वृत्तास महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दुजोरा देत येत्या दहा दिवसांत हे काम सुरु होणार असल्याचा दावा केला आहे. ६३ गटांममध्ये ६३० कचरा वेचक व्यक्तींची नियुक्ती करण्यात येणार आहे. एक गट सुमारे तीन हजार घरांमधून कचरा गोळा करेल. या कचरा संकलन योजनेंतर्गत दररोज १०० टन कचरा गोळा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

प्रभाग समितीनिहाय घरांची संख्या

वर्तक नगर – १२,३४२

वागळे – ३३,७९३

लोकमान्य सावरकर नगर – ३४,८३९

कळवा- ३९,६०६

मुंब्रा- ६५५४५

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोपरी – ६३७८