मुख्यमंत्री कार्यालयातून चौकशीचे आदेश
लोकसत्ता वार्ताहर
भाईंदर: घोडबंदर परिसरातील समाज मंदिराच्या पुनर्बाधणी करण्याकरिता आलेल्या दलित वस्ती निधीचा वापर खोटे कागदपत्रे दाखवून बळकावल्याचा धक्का दायक प्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळे या संदर्भात वारंवार तक्रारी केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून चौकशी आदेश देण्यात आले आहे.
मीरा- भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर गावामध्ये साईनाथ सेवा नगर येथे सुमारे २० वर्षांपासून समाज मंदिर अस्तित्वात असून ह्य समाज मंदिरचा वापर हा मनपाचे विभागीय कार्यालय म्हणून करण्यात येते आहे. या समाज मंदिरांच्या पुनर्बाधणी करीता ‘मे. समृद्धी ट्रेडिंग कंपनी’ या ठेकेदारास कार्यादेश देण्यात आला होता. मात्र त्या ऐवजी घोडबंदर गावात असलेले जुन्या मासळी मार्केटचा दुरुस्तीचा बनाव करून समाज मंदिर पुनर्बाधणी झाल्याचे दाखवून रुपये २४ लाखांचा शासनाचा निधी घेतल्याचे समोर आले आहे.
या समाज मंदिर पुनर्बाधणी करण्यासाठी शासनाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या आदेशाच्या पत्रानुसार बैठकीत रुपये ३ कोटीचे अनुदान मंजूर केले होते व त्या अनुषंगाने शहरात १७ कामांचा प्रस्ताव पालिकेने विशेष महासभेत २० फेब्रुवारी २०१८ साली ठराव क्र. ६८ नुसार आवश्यक ती कागदपत्रे व तांत्रिक मान्यतेसह मंजूर करण्यात आला होता.
‘मे. समृद्धी ट्रेडिंग कंपनी’ला बांधकाम विभागा कडून १ ऑक्टोबर २०१८ साली कार्यादेश देण्यात आला, मात्र त्या संबंधित ठेकेदार यांनी काम न- करता घोडबंदर गावातीलच जुने असलेले मासळी बाजाराचे फोटो लावून तसेच खोटे देयक देऊन समाजमंदिराच्या निधीचा पुनर्बाधणी केल्याचा बनाव करून दलित वस्ती निधी बळकावला असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने १८ ऑगस्ट २०२० ला दलित वस्ती निधी भ्रष्टाचारप्रकरणी सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनीसुद्धा आयुक्तांना पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र त्यांच्या मागणीलादेखील प्रशासनाने केराची टोपली दाखवली गेली आहे. त्यामुळे या घोटाळ्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाजिक न्याय विभाग व नगर विकास विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दलित वस्ती निधीचा वापर खोटय़ा पद्धतीने करून तब्बल २४ लाख रुपये बळकावण्यात आले आहे. त्यामुळे या संदर्भात मी तक्रार केली असून आंदोलनदेखील केले आहे. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. आता मुख्यमंत्री कार्यालयातून चौकशीचे आदेश आल्यामुळे न्याय मिळेल असा विश्वास वाटत आहे.
– राजेश जाधव, तक्रारदार
तो संपूर्ण प्रभाग दलित वस्ती म्हणून आहे. त्यामुळे त्या भागातील समाजमंदिर व्यवस्थित असल्यामुळे त्यांच्यासमोरील मोकळ्या मार्केटला सुरळीत बनवण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या वास्तूचा आता चांगले प्रकारे नागरिक वापरदेखील करत आहेत.
– सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग