ठाणे – रेल्वे प्रवाशांना तिकीटासाठी रांगेत उभे राहणे टाळता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने डिजिटल तिकीट व्यवस्था सुरू केली. याच व्यवस्थेला अधिक सोपे आणि एकत्रित स्वरूप देण्यात आले आहे. भारतीय रेल्वेने जुन्या UTS (Unreserved Ticketing System) मोबाईल ॲपवरून प्रवाशांना नव्या रेलवन (RailOne) या एकात्मिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे.

रेलवन ॲप हे एक प्रकारचे ‘सुपर ॲप’ आहे. तिकीट बुकिंग व्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या सुविधांचा समावेश या ॲपमध्ये करण्यात आला आहे. प्रवाशांना या ॲपवरून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षित तिकीट, लोकल ट्रेनसाठी अनारक्षित तिकीट, तसेच प्लॅटफॉर्म तिकीट काढणे शक्य होणार आहे.

तिकीट सेवांसोबतच या ॲपमध्ये पीएनआर (PNR) स्टेटस तपासणे, ट्रेनचे लाईव्ह लोकेशन तपासणे, कोचची निश्चित स्थान पाहणे, उपलब्ध गाड्यांचा शोध घेणे अशा विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान जेवण ऑर्डर करण्याची आणि तिकीट रिफंडसाठी अर्ज करण्याची सुविधाही देखील ॲप मध्ये आहे.

प्रवाशांचा अडचणी सोडविणार

प्रवासादरम्यान प्रवाशांना कोणतीही अडचण आल्यास Rail Madad या पर्यायाद्वारे स्वच्छता, सुरक्षा, कर्मचारी किंवा इतर तक्रारी थेट रेल्वेकडे नोंदविता येणार आहेत.

३ टक्के सवलत

RailOne ॲपचा वापर वाढावा यासाठी रेल्वे प्रशासनाकडून डिजिटल पेमेंटद्वारे अनारक्षित तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना ३ टक्के सवलत किंवा कॅशबॅक देण्यात येत आहे.

युटीएस ॲप बंद होणार ?

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, UTS ॲप हे पूर्णपणे बंद करण्यात आलेले नाही. मात्र, मासिक, त्रैमासिक पास काढणे किंवा नूतनीकरणाची सुविधाही केवळ रेलवन ॲपवर उपलब्ध आहे. येत्या काळात सर्व रेल्वे डिजिटल सेवा RailOne ॲपवर केंद्रीत केल्या जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

रेलवन ॲप कसे वापरणार ?

रेल्वेचे तिकीट बुकिंगसाठी असणारे रेलवन ॲप पुढील प्रक्रियेद्वारे वापरता येणार आहे.

  • १) गुगल प्लेस्टोर किंवा ॲपल ॲप स्टोर वर जाऊन रेलवन (RailOne) ॲप डाउनलोड करा
  • २) ॲपवर मोबाईल क्रमांक टाकावा. त्यावर ओटीपी येईल. त्यानंतर प्रवाशांनी स्वत:ची मुलभूत माहिती भरावी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीन M-PIN सेट करावा.
  • ३) UTS वरून महिन्याचा पास रेलवन ॲपवर ट्रान्सफर करण्यासाठी UTS ॲप उघडावा. त्यावर ट्रान्स्फर तिकीट (Transfer Ticket) लिंकवर क्लिक करावे. रेलवन मध्ये लॉगिन करून प्रवाशांचा मासिक / त्रैमासिक / वार्षिक पास रेलवन ॲपवर ट्रान्सफर होईल. तसेच UTS वॉलेटमधील शिल्लक रक्कमही रेलवन वॉलेटमध्ये जमा होईल.
  • ४) लोकल / अनारक्षित तिकीट काढण्यासाठी रेलवन ॲप उघडावे. त्यात अनरिझर्व्ड तिकिट (Unreserved Ticket) पर्याय निवडावा. त्यावर (From – To) स्टेशन निवडून, प्रवासाचा प्रकार (लोकल / मेल-एक्सप्रेस) निवडावे. त्यानंतर UPI / कार्ड / वॉलेट द्वारे पेमेंट करावे.
  • ५) सीझन पास काढण्यासाठी किंवा नुतनीकरणासाठी सीझन पास (Season Pass) पर्यायावर जावे. त्यावर मार्ग (Route) निवडावे. त्यानंतर १, ३ महिने किंवा १ वर्ष असा कालावधी निवडून पेमेंट करावे. हा पास रेलवन ॲपमध्ये माय बुकिंग येथे सेव्ह होईल.