कल्याण – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या कल्याण तालुक्यातील कल्याण मुरबाड रस्त्यावरील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयातील गरीब, गरजू, होतकरू तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यावतीने शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. मागील चार वर्षाच्या कालावधीत ७५० विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे. या विद्यार्थ्यांना एकूण एचपीसीएलतर्फे एकूण ४४ लाखाची शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यात आली.
गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात कल्याण तालुक्यातील दुर्गम, डोंगराळ, आदिवासी दुर्गम भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. अनेक विद्यार्थ्यांची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अनेक वेळा जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे या दुर्बल घटकातील मुलांच्या शैक्षणिक मार्गात प्रवेश किंवा इतर शुल्क भरण्याचा अडथळा नको म्हणून स्वताहून रक्कम भरणा करून किंवा काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, कधी त्यांचे शुल्क माफ करून या मुलांचा शैक्षणिक मार्ग प्रवाही राहील यासाठी प्रयत्न करतात. या कार्यासाठी त्यांना भाजपचे आमदार किसन कथोरे यांचे सहकार्य मिळते.
अशा दुर्बल घटकातील मुलांचे शिक्षण पैशाअभावी अर्धवट राहू नये या उदात्त हेतूने एचपीसीएल कंपनीमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ या विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२२–२३ मध्ये एकूण ४७८ विद्यार्थ्यांना सुमारे २६ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली होती. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४–२५ मध्ये २४८ विद्यार्थ्यांना १८ लाख ९० हजार रुपयांची शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे.
एचपीसीएलचे आरोग्य विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. प्रफुल विशे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे व प्राचार्य डॉ. अशोक वाघ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमास टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी, भाजप युवा नेते दिनेश कथोरे, मुरबाडी भाषेतून कथन करणाऱ्या प्राची पाटील, कलाकृती संचालक चिता शेट्टी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा गुंजाळ, सुरेश गायकर, डॉ. प्रतीक्षा घोडविंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उल्लेखनीय सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाबद्दल जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे, प्राचार्य डॉ. अशोक वाघ, उपप्राचार्य प्रा. हरेंद्र सोष्टे, ग्रंथपाल. प्रा. राजाराम कापडी, श्री. पंकज मोरे यांनी डॉ. प्रफुल्ल विशे यांनी कंपनीतर्फे दिलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले. दरम्यान, शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी ८०० विद्यार्थ्यांनी एचपीसीएल शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले असून, आगामी काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.
