ठाणे – महिलांमध्ये वाढत्या प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेला लसीच्या दुष्परिणामांच्या विविध अफवांमुळे ठाणे जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती आहे. महिला दिनाचे औचित्य साधत ८ मार्चपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह अंबरनाथ आणि बदलापूर पालिका क्षेत्रातील सुमारे १७ हजार किशोरवयीन मुलींना प्रथम टप्प्यात मोफत लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र मोहिमेला सुरुवात होऊन काही महिने उलटल्यानंतर ही एकूण पात्र मुलींपैकी निम्म्याहून कमी मुलींनीच ही लस घेतली आहे. यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.
महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग हा अत्यंत गंभीर व वेगाने वाढणारा आजार मानला जातो. हा कर्करोग मुख्यत्वे ”ह्युमन पॅपिलोमाव्हायरस” (एचपीव्ही) या विषाणूमुळे होतो. एचपीव्ही हा एक सामान्य विषाणू असून त्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काही प्रकार महिलांच्या गर्भाशयाच्या मुखातील पेशींमध्ये बदल घडवून आणतात व कालांतराने त्यातून कर्करोगाची निर्मिती होऊ शकते. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराची लक्षणे स्पष्ट दिसून येत नाहीत, त्यामुळे अनेकदा निदान उशिरा होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक लसीकरणाला अत्यंत महत्त्व दिले जात आहे.
भारतात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगानंतर सर्वाधिक प्रमाणात आढळणाऱ्या कर्करोगांपैकी हा एक असल्याचे आरोग्य विभागाच्या विविध आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात आरोग्य तपासणीची कमतरता व जागरूकतेचा अभाव यामुळे या आजाराचे प्रमाण अधिक आढळून येते. याच पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागाने शाळा, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालये आणि गावपातळीवरील आरोग्य यंत्रणा यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणावर नियोजन केले होते. पात्र मुलींची यादी तयार करण्यात आली, पालकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि आरोग्य कर्मचारी यांना कामाला लावण्यात आले. मात्र प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी अनेक पालकांनी आपल्या मुलींना लस घेण्यास नकार दिला किंवा प्रतिसाद दिला नाही.
आरोग्य विभागाच्या प्राथमिक पाहणीत यामागे समाज माध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या अफवा, अपूर्ण माहिती आणि काही जाणीवपूर्वक पसरविल्या जाणाऱ्या भूलथापा हे मोठे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजमाध्यमांमध्ये एचपीव्ही लसीबाबत दिशाभूल करणारी माहिती मोठ्या प्रमाणात फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही संदेशांमध्ये “ही लस घेतल्यास भविष्यात मुलींना अपत्य होणार नाही,” “शरीरातील संप्रेरके बिघडतात,” “मासिक पाळीवर गंभीर परिणाम होतो,” “लसीमुळे पुढे गंभीर आजार होऊ शकतात,” “ही लस अजून पूर्णपणे सुरक्षित नाही,”अशा प्रकारचे दावे करण्यात येत आहेत. या अफवांचा थेट परिणाम ग्रामीण भागातील कुटुंबांवर होत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आहे.
अनेक पालकांकडे लसीबाबत पुरेशी वैद्यकीय माहिती नसल्याने समाज माध्यमांवर आलेले संदेशच खरे मानले जात आहेत. विशेषतः ग्रामीण भागात आणि कमी जागरूकता असलेल्या भागांमध्ये “मुलगी अजून लहान आहे, आता लसीची गरज काय?”, “लग्नाआधी अशा लसींची गरज नसते,” किंवा “शरीरात काही बदल झाला तर जबाबदार कोण?” अशा शंकांमुळे पालक मागे हटत असल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. या अफवांमुळे या मोहिमेला मोठा फटका बसत आहे.
कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी सुरू झालेल्या या लसीकरण मोहिमेला समाजातील अफवा आणि गैरसमजांचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. एचपीव्ही लस ही गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी अत्यंत महत्त्वाची लस आहे. समाज माध्यमांवर फिरणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून मी माझ्या मुलीला देखील ही लस दिली आहे.– डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे</strong>
