ठाणे : किशोरवयीन मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहिमेला ठाणे जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ६५३ पात्र मुलींपैकी आतापर्यंत केवळ ५ हजार ८७४ मुलींचे लसीकरण झाले असून हे प्रमाण अवघे चार टक्के इतके आहे. त्यामुळे पालकांमधील संभ्रम, सोशल मीडियावरील अफवा आणि अपुरी जनजागृती यामुळे मोहिमेचा वेग मंदावल्याचे चित्र समोर आले आहे.

भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा गंभीर कर्करोग मानला जातो. या आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने १४ वर्षे पूर्ण झालेल्या आणि १५ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘क्वाड्रीव्हॅलंट एचपीव्ही’ लस मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार ही लस सुरक्षित, प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित असून जगभरातील कोट्यवधी मुलींना ती देण्यात आली आहे.

मात्र, जिल्ह्यातील लसीकरणाच्या आकडेवारीकडे पाहता मोहिमेला अपेक्षित गती मिळालेली नाही. ठाणे विभागात ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात ८३ हजार १८७ पात्र मुलींपैकी ३ हजार ६०२ मुलींचे लसीकरण झाले आहे. पालघरमध्ये ३५ हजार ५९६ पात्र मुलींपैकी तुलनेत १ हजार ५७१ मुलींना लस देण्यात आली आहे, तर रायगडमध्ये २५ हजार ८७० मुलींपैकी केवळ ७०१ मुलींचे लसीकरण झाले आहे.

सोशल मीडियावर लसीकरणाबाबत चुकीची माहिती आणि अफवा मोठ्या प्रमाणात पसरवल्या जात आहेत. लसीमुळे भविष्यात आरोग्यावर परिणाम होतो, प्रजननक्षमतेवर परिणाम होतो अशा गैरसमजांमुळे काही पालक अजूनही साशंक आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या लसीचा प्रजननक्षमतेवर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मुलगी मासिक पाळीत असली तरीही ही लस सुरक्षितपणे देता येते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मोहिमेला गती देण्यासाठी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. पालकांशी थेट संवाद साधून लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

किशोरवयीन मुलींच्या आरोग्य संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण ही अत्यंत महत्त्वाची प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. भविष्यात गर्भाशय मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी पालकांनी आपल्या मुलींचे वेळेत लसीकरण करून घ्यावे. जिल्हा परिषद ठाणे प्रशासनामार्फत प्रत्येक पात्र मुलीपर्यंत ही सुविधा सुरक्षित आणि प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. – रणजित यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी