ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ३.०७ टक्क्यांनी निकाल घटला असून यंदा ९०.६७ टक्के निकाल लागला. यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली. जिल्ह्यात ९२.९८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाने दिली.
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२५ – २६ चा बारावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यात जिल्ह्याचा ९०.६७ टक्के निकाल लागल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाने दिली. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला ५१ हजार १५३ मुले आणि ४९ हजार ४१३ मुली असे एकूण १ लाख ५६६ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी ९० हजार ८५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ४५ हजार ९१ मुले आणि ४५ हजार ७६८ मुलींचा समावेश आहे.
यंदाही जिल्ह्यात बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात ८८.६२ टक्के मुले, तर ९२.९८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. विज्ञान शाखेचा सर्वाधिक म्हणजेच ९६.७६ टक्के निकाल लागला आहे. त्यात ९६.३० टक्के मुले, तर ९७.२९ टक्के मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. विज्ञान शाखेतून ४१ हजार ७५३, कला शाखेतून १२ हजार ३३२, वाणिज्य शाखेतून ४५ हजार ३८६, उच्च माध्यमिक व्यवसाय शाखेतून ४०४ आणि विज्ञान – तंत्रज्ञान शाखेतून २२७ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यात विज्ञान शाखेतून ४० हजार ४०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी सरस
जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी निकालात सरस ठरले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून १५ हजार ८७३ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेला बसले होते, त्यापैकी १४ हजार ७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात बारावीचा निकाल ९२.७७ टक्के इतका लागला. उत्तीर्ण १४ हजार ७२६ विद्यार्थ्यांमध्ये ७ हजार ५६५ मुलांचा, तर ७ हजार १६१ मुलींचा समावेश आहे.
शहर – तालुकानिहाय निकाल(टक्केवारीनुसार)
| शहर | उत्तीर्ण मुले | उत्तीर्ण मुली | एकूण |
| ठाणे | ९०.३३ | ९४.०५ | ९२.१२ |
| कल्याण – डोंबिवली | ८८.१५ | ९१.८० | ८९.९४ |
| भिवंडी | ८६.६७ | ९४.१४ | ९०.६१ |
| उल्हासनगर | ८५.५४ | ९०.०९ | ८७.७४ |
| नवी मुंबई | ९१.६१ | ९४.०२ | ९२.७७ |
| मिरा- भाईंदर | ८९.७८ | ९३.५५ | ९१.६४ |
| कल्याण ग्रामीण | ८८.३५ | ९५.०३ | ९१.०६ |
| अंबरनाथ | ९१.३९ | ९४.०२ | ९२.७३ |
| भिवंडी ग्रामीण | ७८.१६ | ९०.५४ | ८४.४० |
| मुरबाड | ८२.१४ | ९२.९९ | ८७.८३ |
| शहापूर | ८४.५८ | ९२.२० | ८८.६२ |
| एकूण | ८८.६२ | ९२.९८ | ९०.७६ |
