‘हा फर्स्ट क्लासचा डबा आहे की थर्ड क्लासचा..’ मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तोंडात असे वैतागलेले शब्द आपसूक येतात. कारण या डब्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झालेली आहे. तुटलेली आणि फाटलेली आसने, प्रचंड अस्वच्छता यामुळे या डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक स्थानकांमध्ये द्वितीय श्रेणीचे प्रवासी या डब्यात घुसखोरी करतात, त्यामुळे गर्दीचा त्रास प्रथम श्रेणीच्या प्रवाशांनाही सहन करावा लागतो. रेल्वे प्रशासन प्रथम श्रेणी प्रवासासाठी जास्तीचे भाडे आकारत असले तरी सुविधांची मात्र वानवा असल्याचे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे प्रवासी संघटनांनी या विषयी प्रथम श्रेणीच्या डब्यांच्या देखभाल-दुरुस्तीची मागणी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.
आसनांची दुरवस्था
प्रथम श्रेणी वर्गासाठी प्रवासी जादा पैसे मोजत असले तरी या डब्यात शिरल्यानंतर मात्र प्रवाशांचा संताप सुरू होतो. डब्यातील आसने तुटलेल्या आणि फाटलेल्या अवस्थेत आहेत.
आसनांचे आवरण फाटून त्यातून स्पंज पूर्णपणे बाहेर आल्याने या आसनांवर बसणार कसे, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. गर्दीच्या काळात नाईलाजाने अशा तुटक्या आसनांवरून प्रवास करावा लागत असल्याने त्याचा त्रास प्रवाशांना होतो. या आसनांवर प्रचंड धूळ असते, ती साफ करण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासन घेत नाही. त्यामुळे प्रवाशांचे कपडे खराब होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. रात्रीच्या वेळेत गर्दुल्ले आणि भिकारी पहिल्या दर्जाच्या डब्यांमध्ये आसनांवर झोपलेले आढळतात.

प्रवाशांची बेशिस्त कारणीभूत
प्रवासी संघटनांच्या वतीने प्रथम श्रेणी प्रवाशांच्या चांगल्या दर्जाच्या डब्यांच्या मागणीला पाठिंबा दिला असून त्यासाठी विभागीय व्यवस्थापकांना पत्र पाठवले आहे. त्याचबरोबरीने प्रथम श्रेणी प्रवाशांनाही शिस्तीत वागण्याची गरज प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. पुरेशी गर्दी नसताना पुढील आसनांवर पाय ठेवून बसणे, फाटलेल्या आसनांना अधिकच कमकुवत करणे असे प्रकार केले जातात. कधी कधी अन्य समाजकंटकांकडूनही असे प्रकार घडत असताना तो थांबवण्यासाठी प्रवासी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे डब्यामध्ये थुंकणे, खाद्यपदार्थाच्या रिकाम्या पिशव्या, पॅकेट, टरफल, फळांच्या साली टाकणे, असे प्रकार होत आहेत, असे उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी सांगितले.

तिकीट तपासणीसांचे दुर्लक्षही यासाठी कारणीभूत आहे.
गर्दीच्या काळात तिकीट तपासणीसांची संख्या अत्यंत कमी असून त्यामुळे प्रथम श्रेणी डब्यात अन्य प्रवासी घुसण्याचे प्रकार घडतात. तिकीट तपासणीससुद्धा क्वचितच अशा प्रकारच्या घुसखोरांविरोधात कारवाई करत असल्याने अशा प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे. ती रेल्वे पोलिसांकडून रोखली गेली पाहिजे.
– रवींद्र सकपाळ, रेल्वे प्रवासी