‘जोडो जम्मू-काश्मीर’ हे ध्येय आणि ‘सेवा परमो धर्मः’ हा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारत HUM Charitable Trust (हम चॅरिटेबल ट्रस्ट), डोंबिवली यांच्या वतीने ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये ‘धन्वंतरी मेडिकल कॅम्प २०२६’चे आयोजन करण्यात आले होते. कुपवाडा जिल्ह्यातील सीमावर्ती भागापासून श्रीनगरपर्यंत चार वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिरांना नागरिक, भारतीय सैन्यदलातील जवान, शीख बांधव, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चारही शिबिरांचा मिळून सुमारे १,००० जणांनी लाभ घेतला.

सीमावर्ती भागातील नागरिकांसह जवानांसाठी आरोग्यसेवा

या उपक्रमातील पहिले दोन मेडिकल कॅम्प भारतीय सैन्यदलाच्या ४७ RR (राष्ट्रीय रायफल्स) च्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. पहिला कॅम्प कुपवाडा जिल्ह्यातील कांडी गाव परिसरातील कीगाम येथे ४७ RR मिलिटरी कॅम्पमध्ये पार पडला, तर दुसरा कॅम्प कुपवाडा येथील वावूर गावातील ४७ RR मिलिटरी कॅम्पमध्ये आयोजित करण्यात आला. या दोन्ही शिबिरांचा मिळून जवळपास ६०० गावकऱ्यांनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला.

लष्कराच्या ४७ RR चे कर्नल महिंदर यांनी डॉक्टर आणि हमच्या कार्यकर्त्यांच्या निवासाची तसेच भोजनाची उत्तम व्यवस्था मिलिटरी कॅम्पमध्ये केली होती. हे दोन्ही कॅम्प निसर्गरम्य परिसरात असले, तरी तेथील जवानांचे जीवन अत्यंत कष्टप्रद आणि आव्हानात्मक आहे. सीमेवरील परिस्थितीमुळे जवानांना सदैव सतर्क आणि तत्पर राहावे लागते. त्यांच्या या जीवनशैलीचा जवळून अनुभव घेण्याची संधी या निमित्ताने डॉक्टर आणि कार्यकर्त्यांना मिळाली.

श्रीनगरमधील गुरुद्वारा आणि NIT मध्येही आरोग्य शिबिरे

तिसरा मेडिकल कॅम्प १ नोव्हेंबर रोजी श्रीनगर येथील ऐतिहासिक छट्टी पातशाही गुरुद्वाराच्या आवारात आयोजित करण्यात आला होता. सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत पार पडलेल्या या शिबिराचा सुमारे १२५ शीख बांधवांनी लाभ घेतला. डॉक्टर आणि हमच्या कार्यकर्त्यांच्या निवासाची व्यवस्था गुरुद्वारातच करण्यात आली होती. सर्वांनी गुरुद्वारातील लंगरचा प्रसादही घेतला. या निमित्ताने शीख बांधवांशी स्नेहपूर्ण संवाद आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.

चौथा मेडिकल कॅम्प श्रीनगर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) येथे आयोजित करण्यात आला. प्राध्यापक डॉ. हरविर पाली यांच्या पुढाकाराने हा कॅम्प यशस्वीरीत्या पार पडला. या शिबिराचा जवळपास २०० विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच संस्थेतील कर्मचारीवर्गाने लाभ घेतला.

डॉक्टरांचा सेवाभावी सहभाग

या आरोग्य शिबिरात डोंबिवली येथून डॉ. बकुल पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डाॅ.अमृता कामतेकर, डॉ. जोया पाटील आणि डॉ. सुवर्णा वाणी, कल्याण येथून डॉ. शिल्पी, तर ठाणे येथून डॉ. गौरांगी करमरकर यांनी सहभाग घेतला.

डोंबिवलीहून प्रकल्पप्रमुख आनंद फाटक, जयंत पित्रे आणि सुनील देशपांडे आणि चिन्मय कामतेकर या कार्यकर्त्यांनीही या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. हम च्या महिला कार्यकर्त्यांनी ह्या कॅम्प च्या पुर्वतयारीत खुप मेहनत घेतली हे येथे नमूद करायला पाहिजे.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व डॉक्टरांनी कोणताही मोबदला न घेता, स्वखर्चाने श्रीनगर येथे येऊन ही आरोग्यसेवा दिली. कोणतीही अपेक्षा न ठेवता, केवळ सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावनेतून त्यांनी केलेले हे कार्य म्हणजे ‘सेवा परमो धर्मः’ या उक्तीचे जिवंत उदाहरण ठरले.

संघटनशक्ती आणि समन्वयातून उपक्रम यशस्वी

या संपूर्ण मेडिकल कॅम्पच्या यशस्वितेसाठी श्रीनगर येथील श्री. मनोज नशिराबादकर यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच डोंबिवलीतील हमच्या कार्यकर्त्यांनीही नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत मोलाचे योगदान दिले. डॉक्टर, स्थानिक सहकारी, भारतीय सैन्यदल आणि हमचे कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला. ‘संघटनमे शक्ती है’ या तत्त्वाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

‘जोडो जम्मू-काश्मीर’च्या दिशेने आणखी एक यशस्वी पाऊल

सीमेवरील भारतीय जवान, सीमावर्ती भागातील नागरिक, श्रीनगरमधील शीख बांधव तसेच NIT मधील विद्यार्थी आणि कर्मचारी अशा समाजातील विविध घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे काम या उपक्रमातून झाले. केवळ आरोग्यसेवा देणे एवढाच या उपक्रमाचा उद्देश नसून, जम्मू-काश्मीरमधील विविध समाजघटकांशी स्नेहबंध निर्माण करणे, परस्पर विश्वास वाढविणे आणि सांस्कृतिक आदान-प्रदानाला चालना देणे हा HUM Charitable Trust चा व्यापक हेतूही या माध्यमातून साध्य झाला. आरोग्यसेवेच्या माध्यमातून माणसांना जोडण्याचा हा प्रयत्न म्हणजेच ‘जोडो जम्मू-काश्मीर’ या हमच्या संकल्पनेचा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.