अतिरेकी ऊर्जेच्या वापरामुळे एकीकडे पर्यावरणाचा आणि दुसरीकडे त्यातून निर्माण होणाऱ्या सुविधांमुळे मानवी क्षमतांचा ऱ्हास होऊ लागला आहे. सुख आणि आनंद या दोन भावनांची सांगड उपभोगाशी घातली गेल्याने जीवन अतिशय गतिमान बनले आहे. मात्र अधिकाधिक मिळविण्याच्या हव्यासामुळे माणसे स्वास्थ्य हरवून बसली आहेत. खरे तर आनंद कुठे बाहेर नसून आपल्या मनात असतो. मात्र याचा सध्या पूर्णपणे विसर पडला आहे. त्यामुळेच आधुनिक विज्ञानाला जरी जंतुजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरी मनोकायिक आजारांचे प्रमाण मात्र वाढले आहे. ज्योतीकडे वेगाने जाणाऱ्या पतंगाप्रमाणे मानवाची विनाशाकडे वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन पर्यावरणवादी विचारवंत आणि लेखक दिलीप कुलकर्णी यांनी बेंडशीळ येथे आयोजित निसर्गायन शिबिरात व्यक्त केले.
आधुनिक युगातील विकासाच्या साऱ्या संकल्पना आणि प्रकल्प हे ऊर्जेवर आधारित आहेत. कोणत्याही प्रकारची ऊर्जा निर्माण होताना मोठय़ा प्रमाणात प्रदूषण आणि कचरा निर्माण होतो. त्याचप्रमाणे अतिरेकी वापरामुळे ऊर्जेचे स्रोतही आटत चालले आहेत. पुढील ५० वर्षांत खनिज तेल काढणे अशक्य होणार आहे. त्यामुळे कमीत कमी ऊर्जेचा वापर होणारी जीवनशैली अनुसरणे शहाणपणाचे ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यासाठी समुचित तंत्रज्ञान वापरावे. आपली कामे आपण करावीत. जगातील एका टोकाला पिकणारी फळे, भाजीपाला दुसऱ्या टोकाला नेऊन विकणे हे शहाणपणाचे नाही. ग्लोबलायझेशनची ही संकल्पना फसवी आहे. इथे पिकणारे इथेच खावे. ‘लोकलायझेशन’चे हे धोरण म्हणजेच खरीखुरी पर्यावरणस्नेही विकासनीती आहे, हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
बेंडशीळ गावातील राजीव भट यांच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या या एकदिवसीय शिबिरात दिलीप कुलकर्णीसोबत त्यांच्या पत्नी पौर्णिमा कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.
उपभोगी वृत्तीमुळेच सध्या नको तितकी स्पर्धा निर्माण झाली आहे. ज्या घरातील मुले-मुली दहावी-बारावीला असतात, त्या घरांमध्ये वर्षभर चक्क सुतक पाळले जाते. या स्पर्धेतून करिअर घडून मुलांना अधिक पैसा मिळतो, पण त्यांना जगणे मिळत नाही. त्यामुळेच आय.टी. क्षेत्रातील अनेक तरुणांना नैराश्य आल्याचे आढळून येते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, निद्रानाश, वाढते ताणतणाव, व्यसनाधीनता, हृदयविकार आदी आजार बळावले आहेत. नियमित प्रार्थना हा मन शांत करण्याचा उत्तम उपाय आहे. एखादे चांगले काम नियमितपणे करीत राहणे म्हणजे तपश्चर्या. त्यातून स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्यातही आनंद निर्माण करता येऊ शकतो, असे पौर्णिमा कुलकर्णी यांनी त्यांच्या व्याख्यानादरम्यान सांगितले.