scorecardresearch

अंबरनाथकरांना धडकी भरवणारा जुन्नरचा बिबटय़ा स्वगृही

ऑक्टोबर महिन्यापासून अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या वेशीवर फिरणारा बिबटय़ा अखेर जुन्नर वनपरिक्षेत्रात परतला आहे.

Mumbai, Leopard, Aarey Colony,

मानवी वस्ती, वनक्षेत्र आणि उल्हास नदीकाठी वावर, तीन महिन्यांत सुमारे १८० किलोमीटरचा प्रवास

बदलापूर: ऑक्टोबर महिन्यापासून अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या वेशीवर फिरणारा बिबटय़ा अखेर जुन्नर वनपरिक्षेत्रात परतला आहे. ऑक्टोबर महिन्यात पहिल्यांदा या बिबटय़ाने कल्याण तालुक्यातील एका वस्तीवर पाळीव प्राण्यांची शिकार केली होती. त्यानंतर सलग तीन महिने तो विविध ठिकाणी दिसून आला. नुकताच या बिबटय़ाने जुन्नर वनपरिक्षेत्रात प्रवेश केल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अंबरनाथ तालुक्याच्या वेशीवर असलेल्या तीन झाडी परिसरातील जंगलात चरण्यासाठी गेलेल्या एका वासराची शिकार या बिबटय़ाने केली होती. त्यानंतर कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील जांभूळ, वसत, शेलवली, भिसोळ या गावांच्या वेशीवर आणि जंगल क्षेत्राच्या जवळ असलेल्या वस्त्यांमध्ये बिबटय़ाने पाळीव प्राण्यांची शिकार केली. या बिबटय़ाने काही दिवसांपूर्वी अंबरनाथ शहरात असलेल्या आयुध निर्माण संस्था, जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्रात, कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर रायते या भागात तर बदलापूर शहराच्या मांजर्ली परिसरापर्यंत फेरफटका मारला होता. काही दिवसांपूर्वी उल्हासनगरजवळच्या सोंग्याची वाडी परिसरातही बिबटय़ाला पाहिल्याचे स्थानिकांनी सांगितले होते. त्यामुळे या सर्व भागांमध्ये त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.  जांभूळ, वसत, शेलवली या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेमध्ये ठराव करत या बिबटय़ाला संरक्षित वनक्षेत्रातील स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. वनविभागाकडून प्रक्रियाही सुरू होती. मात्र १३ जानेवारी नंतर या बिबटय़ाचा कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील वावर कमी झाल्याचे जाणवू लागले.  मात्र आता १४ जानेवारीनंतर या बिबटय़ाने जुन्नर वनपरिक्षेत्रात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे संशोधक डॉ. बिलाल हबीब यांनीही बिबटय़ाच्या जुन्नर वनक्षेत्रात प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

बिबटय़ाची भ्रमंती

जुन्नर वनक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी या बिबटय़ाला रेडिओ कॉलर बसवली होती. त्याच्या हालचाली आणि प्रवासाचा अभ्यास करण्यासाठीचा हा प्रयोग होता. त्यामुळे या बिबटय़ाची हालचालीची दर दोन तासांची माहिती जुन्नर वन क्षेत्रातील अधिकाऱ्यांना मिळत होती. सप्टेंबर महिन्यात जुन्नर वनक्षेत्रात रेडिओ कॉलर लावून सोडण्यात आलेल्या बिबटय़ाने गेल्या तीन महिन्यात सुमारे १८० किलोमीटरचा प्रवास केला आहे. २० ऑक्टोबर २०२१ ते १४ जानेवारी २०२२ या काळात उल्हासनगर ते बदलापूर या वनक्षेत्राच्या ५८ चौरस किलोमीटर परिसरात बिबटय़ाने वास्तव्य केले. त्याच्या १८० किलोमीटरच्या प्रवासात त्याने काळू, उल्हास या नद्या अनेकदा ओलांडल्या. तर कल्याण – अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग आणि टिटवाळा भागातून जाणारा रेल्वे रूळही या बिबटय़ाने ओलांडल्याचे या अभ्यासात समोर आले आहे, अशी माहिती वाईल्ड लाईफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे संशोधक डॉ. बिलाल हबीब यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Human habitation bibatya home return ysh