डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील स्मशानभूमी मागील तलावात शेकडो मासे मृत आढळून आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तलावात आणि तलावाच्या काठी अनेक मासे मृत आढळून आल्याने हे मासे उन्हाच्या तडाख्यामुळे की काही घातपात प्रकारामुळे मृत झाले याविषयी देवीचापाडा भागातील ग्रामस्थ तपास करत आहेत.

देवीचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी देवीचापाडा खाडी किनारा भागात फिरण्यासाठी गेले होते. देवीचापाडा जेटी, सातपूल, स्मशानभूमी परिसरातून फेरफटका मारत असताना स्मशानभूमी मागील तलावात त्यांना तलावात मासे तरंगताना आढळले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले तर तलावात शेकडो मासे मृत झाल्याचे आढळले. काही मासे पाण्यावर तरंंगत होते. काही मासे पक्ष्यांनी तलावाच्या काठी आणून फडशा पाडला होता.

या तलावात गोड्या पाण्यातील मासे असल्याने परिसरातील नागरिक अनेक वेळा याठिकाणी मासेमारी करण्यासाठी येतात. जुन्या काळातील या तलावाचे संवर्धन आणि तलावातील पाणी स्वच्छ राहील यादृष्टीन ग्रामस्थ या तलावाची विशेष काळजी घेतात. परिसरातील गाईगुरे, पशू पक्ष्यांना हा तलाव पिण्याच्या पाण्यासाठी मोठा आधार आहे.

पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांना तलावात मासे मरून पडल्याचे समजताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तलावाच्या ठिकाणी बोलावून घेतले. ही माहिती त्यांनी काही पर्यावरणप्रेमी नागरिकांना दिली. तलावात मासे मरून पडल्याचे देवीचापाडा भागातील नागरिकांना समजताच अनेक मासेमारी करणारे नागरिक, ग्रामस्थांनी तलावाच्या ठिकाणी धाव घेतली. हे मासे नक्की कधी मृत झाले हे समजले नसल्याचे पोलीस पाटील भोईर यांनी सांगितले. कडक उन्हाळा सुरू आहे. तलावांमधील पाणी दुपारच्या वेळेत उकळत्या पाण्यासारखे सणसणते. त्यामुळे या कडक उन्हात गरम पाण्याचा झटका बसून हे मासे मृत झाले का, असे प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

रात्रीच्या वेळेत काही तरूण या भागात मेजवानी करण्यासाठी येत असतात. त्यांच्याकडून काही गैरकृत्य या माशांच्या संदर्भात झाले आहे का याचाही तपास स्थानिक ग्रामस्थ करत आहेत. देवीचापाडा जेट्टी, सातपूल भागात दररोज सकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक तलावांमधील माशांसाठी अनेक वेळा पाव, माशांचे आवडते खाद्य पदार्थ घेऊन येत होते. फावला वेळ म्हणून तलावाकाठी बसून माशांना खाऊ टाकून त्यांच्या पाण्यातील सळसळीचा अनुभव घेत होते. आता तलावातील मासे मृत झाल्याने या नागरिकांचा हिरमोड झाला आहे. मृत माशांवर ताव मारण्यासाठी विविध प्रकारचे पक्षी याठिकाणी ठाण मांडून आहेत.