इंधन दरवाढ, अवकाळी पावसामुळे दरवाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

ठाणे : इंधन दरवाढ आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मागील काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. किरकोळ बाजारात काही भाज्यांनी शंभरी पार केल्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, बाजारात भाज्यांची आवक घटल्याने त्यांच्या दरात वाढ झाल्याची माहिती ठाण्यातील किरकोळ विक्रेत्यांकडून देण्यात आली.

इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीचा खर्च वाढल्याने महागाई वाढल्याचे चित्र असून त्यात जीवनावश्यक वस्तूंसह भाज्यांचाही समावेश आहे. इंधन दरवाढीमुळे भाज्यांचे दरावर परिणाम झाला असतानाच त्यापाठोपाठ आता अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या दराने शंभरी पार केली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. कोबीला मोठी मागणी नसतानाही किरकोळ बाजारात सध्या त्याची विक्री ६० रुपये प्रति किलो दराने होत आहे. शिमला मिरची आणि गवार या भाज्यांनी शंभरी पार केली असून किरकोळ बाजारात या भाज्यांची विक्री १२० रुपये प्रति किलो दराने करण्यात येत आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज भाज्यांच्या ६०० ते ७०० गाडय़ा दाखल होत असतात. परंतु मागील काही दिवसांपासून या संख्येत घट झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यामुळे घाऊक बाजारातही भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आवक घटल्याच्या नावाखाली किरकोळ बाजारात सर्रास ग्राहकांच्या पैशांची लूट केली जात आहे.

कांदेही महाग

मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच तयार कांदाही खराब झाला. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक २५ ते ३० टक्क्यांनी घटल्याची माहिती ठाण्यातील किरकोळ विक्रेते राजेश तांबटकर यांनी दिली. आवक घटल्यामुळे दरात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी कांद्याची वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीत २० ते २५ रुपये प्रति किलो दराने तर किरकोळ बाजारात ३५ ते ४० रुपये प्रति किलो दराने विक्री होत होती. परंतु आता बाजार समितीत ३५ रुपये प्रति किलो दराने तर किरकोळ बाजारात ५० रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री केली जात आहे.

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च महागला होता, त्यामुळे काही प्रमाणात भाज्यांचे दर वाढले. आता ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाज्यांचे मोठे नुकसान झाले असून बाजारात त्यांची आवक घटली आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे.

– कमल रासकर, भाजी विक्रेते