Who is IAS Prashant Lokhande: गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा प्रशासकीय निर्णय घेत मंगळवारी आयएएस अधिकारी प्रशांत लोखंडे यांची सीबीएसईच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांनी राहुल सिंह यांची जागा घेतली असून, त्याच दिवशी राहुल सिंह आणि सीबीएसईचे सचिव हिमांशू गुप्ता यांची बदली करण्यात आली.
ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीबाबत शिक्षक आणि मूल्यांकन प्रक्रियेशी संबंधित विविध तक्रारी व वाद सुरू असताना झालेल्या या बदलाकडे शिक्षण क्षेत्रात विशेष लक्ष वेधले जात आहे. प्रशांत लोखंडे या मराठी अधिकाऱ्याची या महत्त्वाच्या पदावर बदली झाली असतानाच, प्रशांत लोखंडे आहेत कोण हे पाहूया..
प्रशांत सीताराम लोखंडे हे २००१ बॅचचे एजीएमयूटी (अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश) कॅडरचे वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. प्रशासनातील दीर्घ अनुभव असलेल्या लोखंडे यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले असून, नियुक्तीपूर्वी ते केंद्रीय गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. केंद्र सरकारच्या विविध धोरणांच्या अंमलबजावणीत आणि प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशभरातील लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संबंधित असलेल्या सीबीएसईसारख्या महत्त्वाच्या संस्थेचे नेतृत्व आता लोखंडे यांच्याकडे आले आहे.
प्रशांत लोखंडे आहेत तरी कोण?
प्रशांत लोखंडे यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पुणे विद्यापीठातून घेतले. तर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमधील पदव्युत्तर पदविकेचे शिक्षण मुंबई येथून केले.त्यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेचे ते माजी विद्यार्थी होते.
सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्था
ठाणे महापालिका संचलित कै. चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्था ही यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणारी राज्यातील एक महत्त्वाची संस्था मानली जाते. या संस्थेतून यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन करून विविध प्रशासकीय सेवांमध्ये उच्च पदे मिळवली आहेत. प्रशासकीय सेवांमध्ये महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. सध्या विद्यार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपयांचे विद्यावेतन (स्टायपेंड), वसतिगृहाची सुविधा आणि स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक सर्वांगीण मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. देशातील महापालिकांमध्ये अशा प्रकारचे दर्जेदार प्रशिक्षण देणाऱ्या मोजक्या संस्थांपैकी ही एक संस्था आहे.
