डोंबिवली येथील आयसीआयसीआय बँकेच्या एका शाखेमधून १२ कोटी २० लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी ठाणे मालमत्ता गुन्हे शोध कक्षाने तीन जणांना अटक केली आहे. इसरार कुरेशी (३३), शमशाद खान (३३) आणि अनुज गिरी (३०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून १२ कोटी रुपयांपैकी ५ कोटी ८० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यातील मुख्य आरोपी हा बँकेचा कर्मचारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. उर्वरित रक्कम त्याच्याकडे असू शकते असा अंदाज पोलिसांना आहे. जप्त केलेली ५ कोटी ८० लाख रुपयांची रोकड ही एका टेम्पोमध्ये सुमारे दीड आठवडा पडून होती. अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. याप्रकरणात ३४ कोटी रुपयांची चोरी झाली होती. परंतु त्यातील १२ कोटी २० लाख रुपये आरोपी घेऊन गेला होता. तर, उर्वरित रक्कम बँकेच्या आवरात आढळून आली होती.

कल्याण -डोंबिवली शहरातील आयसीआयसीआय बँकेच्या शाखांमधून दिवसभरामध्ये जमा होणारी रक्कम डोंबिवलीतील मानपाडा येथील बँकेच्या शाखेत ठेवण्यात येते. ११ जुलैला, या बँकेमधील सीसीटीव्ही यंत्रामध्ये येथील अधिकाऱ्यांना काही बिघाड आढळून आला होता. त्यानंतर संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांनी तंत्रज्ञांना संपर्कसाधून त्यांना दुरुस्तीसाठी बोलावले. तंत्रज्ञ दुसऱ्या दिवशी बँकेत आले. त्यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले त्यावेळी यातील काही चित्रीकरण गायब असल्याचे आढळून आले. त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे ठेवण्याची जागा तपासली असता, त्यामधील ३४ कोटी रुपये गायब होते. हा सर्व प्रकार पाहून बँकेच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला.

बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालय तपासले असता, सुरक्षा रक्षकाला पैशांनी भरलेल्या काही बॅग आढळून आल्या. या बॅगेमध्ये ३४ कोटी रुपयांपैकी २२ कोटी रुपये आढळून आले. तसेच या पैशांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेला कर्मचारी अल्ताफ शेख हा देखील गायब होता. बँकेच्या अधिकाऱ्यांनी या चोरीप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर, याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या मालमत्ता शोध कक्षाकडून सुरू होता. दरम्यान याप्रकरणातील रोकड मुंब्रा येथे ठेवण्यात आल्याची माहिती मालमत्ता शोध कक्षाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने इसरार कुरेशी, शमशाद खान आणि अनुज गिरी या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ कोटी ८० लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. यातील मुख्य आरोपी अल्ताफ याचा पोलीस शोध घेत आहेत.

सुरक्षा भेदून चोरी
बँकेच्या ज्या भागात पैसे ठेवले जातात. त्या भागातील सुरक्षा व्यवस्था अंत्यत अत्याधुनिक आहे. बँकेत १८ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. अल्ट्रारेड लाईट यंत्रणा, अलार्मची व्यवस्था आहे. असे असतानाही अल्ताफ याने चालाखीने बँकेतील रक्कम काढून घेतली.

बँकेतील १२ कोटी रुपयांची रक्कम घेतल्यानंतर अल्ताफने त्याच्या ओळखीच्या इसरार, शमसाद आणि गिरी या तिघांना बोलावून घेतले. त्यांच्या टेम्पोमध्ये ५ कोटी ८० लाख रुपये ठेवण्यात आले होते. हा टेम्पो मुंब्रा येथे एका ठिकाणी ठेवला होता. सुमारे आठवडाभर या टेम्पोमध्ये कोट्यवधी रुपये पडून होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icici bank theft case bank employee involvement in the crime thane amy
First published on: 19-07-2022 at 17:59 IST