कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्र आणि तेथे चालणाऱ्या कामांविषयी वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून आपल्याकडे कसलीही माहिती नाही. वैद्यकीय प्रशासनावर आपले नियंत्रण नाही. आपण पालिका रुग्णालये, आरोग्य केंद्रांमध्ये कधी भेटी दिल्या नाहीत. त्यामुळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून आपले हे अपयश आहे, अशा खरमरीत शब्दात आयुक्त अभिनव गोयल यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल यांना सुनावले. आणि पालिका रुग्णालयातील प्रत्येक डाॅक्टरने अतिशय समर्पित भावाने रुग्णसेवा करावी. ते जमत नसेल तर त्यांना घरचा रस्ता दाखविला जाईल, असा इशारा आयुक्तांनी डाॅक्टरांना दिला.

कोणीही तुमच्या दारात पालिकेत रुग्णसेवा देण्यासाठी या म्हणून सांगण्यास आले नव्हते. तुम्ही स्वताहून पालिकेत आला आहात. त्यामुळे जबाबदारीचे भान ठेऊन आहे त्या परिस्थितीत योग्यरितीने प्रत्येक डाॅक्टरने रुग्णसेवा द्यावी. ते जमत नसेल तर सरळ बाहेरचा रस्ता दाखविला जाईल, अशी तंबी आयुक्तांनी पालिका रुग्णालयातील डाॅक्टरांना दिली. रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका अभावी सविता बिराजदार (४३) या महिलेचा मृत्यू झाल्याने आयुक्तांनी पालिका रुग्णालयांचा विषय गांभीर्याने घेतला आहे.

शनिवारी सुट्टीचा दिवस असुनही आयुक्त गोयल यांनी पालिका रुग्णालयातील डाॅक्टर, इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची एकत्रित चार तास बैठक घेतली. या बैठकीत आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी दीपा शुक्ला यांना केलेल्या वैद्यकीय सेवेबद्दलच्या प्रश्नावर त्या समाधानकारक उत्तरे देऊ न शकल्याने, आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना कामातील सुधारणेबद्दल सुनावले. रुग्णालयात किती महिला येत्या महिन्यात प्रसुत होणार आहेत. याविषयीची माहिती डाॅ. सुहासिनी बढेकर देऊ शकल्या नाहीत. याबद्दलही आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.बाह्य स्त्रोत संस्थेचे डाॅक्टर वेळेत उपलब्ध होत नसतील आणि नुसती देयके काढण्यासाठी हे डाॅक्टर पालिकेत रुग्ण सेवा देणार असतील तर त्यांच्या पालिकेतील सेवा बंद करा, असे आयुक्तांनी सुचविले. पालिकेते पुरेसे मनुष्यबळ आहे.

आपण चांगली रुग्णसेवा देऊ शकतो, असे ते म्हणाले. साथ रोग नियंत्रण अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील रजेवर असल्याने त्यांच्या विभागाची माहिती डाॅ. शुक्ला देऊ शकल्या नाहीत. त्यामुळेही आयुक्त संतप्त झाले. रुग्णालयातील वैद्यकीय साधने सुस्थितीत राहण्यासाठी देखभाल बायोमेडिकल इंजिनिअर नियुक्तीला आयुक्तांंनी होकार दर्शविला. औषध साठा कक्षाचे विकेंद्रीकरण करून एकाच साठा कक्षावर भार येणार नाही अशी रचना करा, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. पालिका रुग्णालयातील कायमस्वरुपी सात डाॅक्टरांंनीच शवविच्छेदन करायचे आहे, असे आयुक्तांंनी सुचवले.

इमारत योग्य नाही म्हणून रुग्ण सेवा देता येत नाही अशी तकलादू कारणे देऊ नका. येत्या महिनाभरात कारभार सुधारा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी तंबी आयुक्तांनी रुग्णालय कर्मचाऱ्यांना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिका रुग्णालयात पुरेसे मनुष्यबळ आहे. त्यामुळे आहे त्या स्थितीत योग्य पध्दतीने रुग्णसेवा द्या. या कामात हलगर्जीपणा डाॅक्टरांवर कारवाई केली जाईल. – अभिनव गोयल, आयुक्त