निवासी भागातील रस्त्यांची झालेली चाळण पाहता या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून येथील रहिवासी ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’कडे करीत आहेत. मात्र सुरुवातीला महामंडळाने केवळ आश्वासनांवर त्यांची बोळवण केली आणि आता हा विभाग महापालिकेच्या हद्दीत येतो, असे सांगून आपली जबाबदारी झटकली आहे. पालिकेनेही गेल्या दोन महिन्यांत गावांचा कब्जा घेऊनही येथील सोयी सुविधांकडे लक्ष दिलेले नाही. येत्या १५ ऑक्टोबपर्यंत रस्त्यांची डागडुजी न झाल्यास पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ‘डोंबिवली वेल्फेअर असोसिएशन’ने घेतला आहे.
गेल्या पाच वर्षांत निवासी विभागातील रस्त्यांचे डांबरीकरण झाले नाही. रेती किंवा खडी टाकून येथील खड्डे बुजविण्यात येतात. मात्र ते एका पावसाने पुन्हा उखडले जातात. जागोजागी खड्डे असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. नागरिकांना खड्डे चुकवीत रस्त्यावर साचलेल्या चिखलातून चालावे लागत आहे. दोन वर्षांपूर्वी महामंडळाने रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण करण्याची हमी घेतली होती. परंतु आता निवासी भाग महापालिकेत वर्ग झाल्याने रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पालिकेने करणे आवश्यक आहे. पालिकेने येथील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष दिले नाही. १५ ऑक्टोबरपूर्वी ही कामे सुरू करावीत नंतर पावसाचे किंवा आचारसंहितेचे कारण आम्ही खपवून घेणार नाही. अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.