कल्याण पूर्वेतील बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलंगगड रस्त्यावर आडिवली-ढोकळी गावातील माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी तीन माळ्याची बेकायदा इमारत उभारली होती. ही इमारत आयुक्तांच्या आदेशावरुन प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्या नेतृत्वाखालील तोडकाम पथकाने हाय जाॅ क्रशर या शक्तिमान यंत्राच्या साहाय्याने गुरुवारी भुईसपाट केली.पालिकेच्या मागील पाच वर्षाच्या काळात प्रथमच बेकायदा इमारत भुईसपाट करण्यासाठी हाय जाॅ क्रशर यंत्राचा वापर करण्यात आला आहे. आय प्रभागात आडिवली ढोकळी गावातील कोहिनूर प्रकल्पाच्या बाजुला आडिवली ढोकळी प्रभागाचे माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी निवास, महाविद्यालयाचे नाव पुढे करुन तीन माळ्याची एक बेकायदा इमारत गेल्या वर्षभरात उभारली होती. हेही वाचा >>>डोंबिवलीतील कुंभारखाण पाड्यातील बेकायदा शिव सावली गृहप्रकल्पाला ‘महारेरा’ची नोटीस या बांधकामांची पालिका मंजुरीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी बांधकामधारक कुणाल पाटील यांना दिले होते. विहित मुदतीत ते बांधकामाची कागदपत्रे पालिकेत दाखल करू शकले नाहीत. त्यामुळे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी ही इमारत अनधिकृत घोषित केली होती.या बेकायदा इमारतीमुळे परिसरात मल-जलनिस्सारण, वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी ही इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश उपायुक्त सुधाकर जगताप, साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांना दिले होते.जेसीबी, पोकलनेच्या साहाय्याने ही इमारत जमीनदोस्त करणे शक्य नसल्याने हाॅय जाॅ क्रशर या शक्तिमान यंत्राचा वापर साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी ही इमारत पाडण्यासाठी केला. गुरुवारी सकाळी अकरा वाजता तोडकामाला सुरुवात करताच संध्याकाळी चार वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्तात २० कामगारांच्या उपस्थितीत तीन माळ्याची इमारत शक्तिमान यंत्राच्या साहाय्याने भुईसपाट करण्यात आली. पालिका हद्दीत प्रथमच एक इमारत भुईसपाट केली जात असल्याची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिक, काही माफिया हा प्रकार पाहण्यासाठी घटनास्थळी उपस्थित होते. हेही वाचा >>>वसई-पनवेल रेल्वे मार्गावरील स्थानकांच्या मराठी नावांची मोडतोड इमारत पाडकाम करण्यापूर्वी काही मंडळींनी कारवाई रोखण्याचे प्रयत्न केले, त्याला मुंबरकर यांनी दाद दिली नाही. आयुक्तांचे आदेश असल्याने कारवाई होणारच, अशी आक्रमक भूमिका मुंबरकर यांनी घेतल्याने एकही माफिया कारवाई रोखण्यासाठी पुढे आला नाही.अशाच प्रकारे कल्याण-़डोंबिवलीतील बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी जेसीबी, घण यांचा वापर करण्याऐवजी साहाय्यक आयुक्तांनी हाय जाॅ क्रशर यंत्राचा वापर करण्याचे आदेश आयुक्तांनी देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. “आडिवली-ढोकळी भागातील अनेक बांधकामे अनधिकृत म्हणून घोषित करण्यात आली आहेत. ही सर्व जुनी आणि नव्याने उभी राहत असलेली बांधकामे जमीनदोस्त केली जात आहेत. टोलेजंग बांधकामे तोडण्यासाठी यापुढे हाय जाॅ क्रशर यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.”- हेमा मुंबरकर,साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण.