अनैतिक धंद्यांची किनारपट्टी!

सागरी किनारपट्टीवर फोफावलेल्या बेकायदा लॉजमुळे शहराची प्रतिमा दिवसेंदिवस डागाळत चालली आहे

शांत आणि निसर्गरम्य समजल्या जाणाऱ्या वसईच्या सागरी किनारपट्टीवर फोफावलेल्या बेकायदा लॉजमुळे शहराची प्रतिमा दिवसेंदिवस डागाळत चालली आहे. कळंब आणि राजोडी गावातील किनारपट्टीजवळ सुरू असलेल्या शेकडो लॉजमध्ये होणारे प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे आणि अनैतिक धंदे केवळ वसईच नव्हे तर मुंबई, ठाण्यासारख्या शहरांतील तरुण-तरुणींना वाममार्गाकडे घेऊन चालले आहेत. या लॉजवर कारवाई करण्याचे आदेश काढूनही तांत्रिक कारणे देत टाळाटाळ केली जात असल्याने वसईकरांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
वसईची पश्चिम किनारपट्टी नेहमीच पर्यटकांचे आकर्षण केंद्र राहिले आहे. त्यातच शहरापासून जवळ असल्यामुळे मुंबई-ठाण्यातील अनेक प्रेमी युगुले या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी येत असतात. याचाच गैरफायदा घेत या भागातील अनेक स्थानिकांनी किनारपट्टीजवळ छोटय़ा छोटय़ा खोल्या उभारल्या आहेत. या खोल्यांसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. किनारपट्टीवर येणाऱ्या जोडप्यांना प्रतितास दराने भाडे आकारून या खोल्या पुरवल्या जातात. अशा खोल्यांचा वापर अश्लील चाळे व अनैतिक धंदे करण्यासाठी केला जात आहे.
या बेकायदा लॉजच्या विरोधात परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यावर कडक कारवाई झालेली नाही. २०१३ मध्ये या संदर्भात राजकीय, सामाजिक संघटनांच्या माध्यमांतून आंदोलन उभारण्यात आल्यानंतर तत्कालीन तहसीलदारांनी कळंब, राजोडी या गावांतील ७२ लॉज अनधिकृत असल्याचे जाहीर केले. मात्र, हे लॉज पाडण्याची कारवाई करण्याची प्रशासनाने तयारी चालवली असतानाच एका मोठय़ा नेत्याच्या मध्यस्थीने ही कारवाई थांबवण्यात आली. तेव्हापासून हे लॉज राजरोसपणे अनैतिक धंदे चालवत आहेत. या भागातील स्थानिक रहिवाशांनी सरकारी जागेवर या बेकायदेशीर खोल्या बांधल्या आहेत. एकेका मालकाने दहा ते पन्नास खोल्या बांधून त्या प्रतितास अडीचशे ते पाचशे रुपयाने दिल्या जातात. त्यामुळे महिन्याला किमान तीन लाख ते पंधरा लाख उत्पन्न त्यांना मिळते. त्यातील मोठा वाटा स्थानिक पोलीस ठाणे आणि महसूल विभागाला पोहोचवला जातो, असा नागरिकांचा आरोप आहे. या संदर्भात वसईचे तहसीलदार सुनील कोळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘वसईत अनेक ठिकाणी बेकायदेशीर बांधकामे आहेत. या ठिकाणच्या लॉज मालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्या बाबतची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे कारवाईला अडथळा येत आहे.’

कारवाईची ‘गुप्त योजना’
पालघरच्या पोलीस अधीक्षकपदी नुकत्याच रुजू झालेल्या शारदा राऊत यांनी या भागातील बेकायदा लॉजवर कारवाई करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. नवरात्रोत्सवानंतर या कारवाईला सुरुवात केली जाईल, असे त्या म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Illegal business near vasai sea