डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा भागातील खारफुटी तोडून, तलाव भागात भराव टाकून उभारण्यात आलेल्या बेकायदा चाळी शुक्रवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त समीर भूमकर यांच्या आदेशावरून तोडकाम पथक आणि जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्या.
पालिका निवडणूक काळात गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत या बेकायदा चाळी देवीचापाडा खाडी किनारा भागातील मोकळ्या जागा, खारफुटी तोडून उभारण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी तक्रारदार कल्पेश जोशी यांनी आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले होते. या बेकायदा चाळींमुळे देवीचापाडा भागातील एकमेव हरितपट्टा नष्ट होत असल्याने स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या बेकायदा चाळी खारफुटी तोडून, खाडी किनारा भागात भराव टाकून उभारण्यात आल्याने पर्यावरण ऱ्हासाचा विचार करून ‘लोकसत्ता’ने गेल्या महिन्यापासून या बेकायदा चाळींविरूध्द आवाज उठविला होता.
या बेकायदा चाळी तोडण्यासाठी सर्व स्तरातून प्रभावी मागणी होऊ लागली. भूमाफिया विविध प्रकारचे दबाव आणून ही कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात अधिकाऱ्यांना अडथळे येत होते. शुक्रवारी दुपारी ह प्रभागाचे राजेश सावंत यांनी तोडकाम पथक, जेसीबी घेऊन देवीचापाडा खाडी किनारा परिसर गाठला. आणि एकापोठापाठ उभारण्यात आलेल्या बेकायदा चाळी तोडकाम पथक आणि जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट करण्यात आल्या. आपल्या चाळींवर कारवाई होणार नाही या विचारात असलेल्या भूमाफियांची या कारवाईने पळापळ झाली. चाळी उभारण्याची कामे या भागात सुरू होती. कारवाई पथक येताच या कामांवरील गवंडी, मजूर कामे टाकून पळून गेले. कारवाईच्या वेळी एकही भूमाफिया कारवाई रोखण्यासाठी पुढे आला नाही. यापूर्वी फिरण्यासाठी मोकळा असलेला परिसर मोकळा झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
कोपर भागातही हातोडा
देवीचापाडा कारवाईप्रमाणे तोडकाम पथकाने कोपर गाव भागात खाडी किनारा बुजवून, खारफुटीची झाडे तोडून म्हाळसाई चाळीच्या बाजुला उभारलेल्या बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याची मागणी स्थानिक रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी करत आहेत. तक्रारदारही या बेकायदा चाळी तोडण्यासाठी आक्रमक आहे.
देवीचापाडा भागातील बेकायदा चाळी शुक्रवारी कारवाई करून जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. या चाळी पुन्हा उभारल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. अशाच पध्दतीने कोपर भागातील चाळींवर कारवाई करण्यात येईल. – राजेश सावंत साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग क्षेत्र.

