कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभाग हद्दीतील टिटवाळा-बल्याणी, बनेली भागात बेसुमार बेकायदा चाळींची बांधकामे सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी अ प्रभागाचे साहाय्यक संदीप रोकडे यांना शिस्तभंग कारवाईची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला दोन दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या आठवड्यात आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड टिटवाळा भागात बाह्यवळण रस्त्याची पाहणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना बल्याणी, बनेली भागात डोंगर फोडून, वळण रस्त्याच्या मार्गात, लगत बेकायदा बांधकामे सुरू असल्याचे दिसले. या बेकायदा बांधकामप्रकरणी आयुक्तांनी साहाय्यक आयुक्त रोकडे यांना जाब विचारला होता.

हेही वाचा…अजित पवार म्हणतात “मुख्यमंत्री करणार असे सांगितले असते तर…”

प्रभागातील अनधिकृत बांधकामांचे नियंत्रण करणे, ती तोडून टाकणे हे पदनिर्देशित अधिकारी म्हणून साहाय्यक आयुक्तांचे काम आहे. ही बेकायदा बांधकामे तोडण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आपणास वैयक्तिक जबाबदार धरून आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी नोटीस आयुक्त डॉ. जाखड यांनी साहाय्यक आयुक्त रोकडे यांना दिली आहे. दोन दिवसात या खुलाशाला उत्तर न दिल्यास आपणावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल, अशी तंबी आयुक्तांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात लोकसत्ताने टिटवाळ्यातील बेकायदा चाळींविषयी वृत्त प्रसिध्द केले होते. बनेली भागातील चाळींची समाज माध्यमांवर जाहिरात करून या चाळींमधील खोल्यांची बेकायदा विक्री करून सामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बनेली येथील भूमाफिया अब्दुल अतिक फारूकी याच्यावर पालिकेने एमआरटीपीचा गुन्हा टिटवाळा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. के. एफ. एन्टरप्रायझेस या नावाने अब्दुल बांधकाम व्यवसाय करतो. बल्याणी, बनेली, उंभर्णी भागात बेसुमार चाळींची अ प्रभाग कर्मचाऱ्यांच्या संगनमताने भूमाफियांनी चाळी उभारल्याच्या तक्रारी आहेत. एका निवृत्त पालिका कर्मचाऱ्याने रस्त्यालगत बेकायदा गाळा बांधला आहे.

हेही वाचा…Mumbra news: मुंब्य्रात श्वान अंगावर पडून मुलीचा मृत्यू

आय, ह प्रभागात असताना साहाय्यक आयुक्त रोकडे यांनी बेकायदा बांधकामांना नोटिसी देण्याव्यतिरिक्त कधीही बांधकामे भुईसपाट करण्याची कारवाई केली नाही, अशा तक्रारदारांच्या तक्रारी आहेत. अ प्रभागात आयुक्तांनी आक्रमकपणे काम करणारा साहाय्यक आयुक्त नियुक्त करावा, अशी मागणी टिटवाळा भागातील जागरूक नागरिकांनी केली आहे.

आयुक्त डॉ. जाखड यांनी डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभागात अचानक दौरा करून या भागात सुरू असलेली बेकायदा बांधकामे, खाडी किनारच्या चाळींची पाहणी करावी. अशीच कारवाई ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांवर घेण्याची मागणी तक्रारदार करत आहेत. ह प्रभागात बेकायदा बांधकामांवर कारवाईच केली जात नसल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या दोन दिवसापूर्वी बेकायदा चाळी तोडण्याचा फक्त देखावा करण्यात आल्याचे तक्रारदार सांगतात. साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना सतत संपर्क केला. त्यांचा मोबाईल बंद होता.

हेही वाचा…कल्याणमध्ये मोटार चालकाचा दुचाकी स्वाराला ठार मारण्याचा प्रयत्न

टिटवाळा बनेली, बल्याणी भागात बेसुमार बेकायदा चाळींची कामे सुरू आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश साहाय्यक आयुक्त रोकडे यांना दिले आहेत. या बांधकामांवर कारवाईस कुचराई केली म्हणून आयुक्तांनी त्यांना नोटीस दिली आहे. – अवधूत तावडे उपायुक्त, अतिक्रमण नियंत्रण.