ठाणे : मुंब्रा येथील शीळ भागातील बेकायदा इमारत उभारणीच्या प्रकरणावरून उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर ठाणे महापालिकेने संपुर्ण शहरात बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई सुरू केली असली तरी शहरात आजही बेकायदा बांधकाम सुरू असल्याची बाब पुढे आली आहे.
जुन्या ठाण्यालगतच असलेल्या तीन हात नाका येथील एका बड्या संकुलाच्या संरक्षक भिंतीला लागूनच बेकायदा बांधकाम उभारणीचे काम सुरू असून याप्रकरणी संकुल समितीने ठाणे पालिका आयुक्त तसेच पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात बेकायदा इमारती तसेच बांधकामे करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या बांधकामांवर कारवाई होत नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे. असे असतानाच, मुंब्रा येथील शीळ भागात गेल्या वर्षी उभारण्यात आलेल्या १७ बेकायदा इमारतींचे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले. याप्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना इमारतीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कारवाई करावी लागली होती. तसेच ना विकास आणि हरित क्षेत्रात झालेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते.
यानंतर ठाणे महापालिकेने शहरातील बांधकामांचे सर्वेक्षण सुरू केले असून त्याचबरोबर प्रभाग समितीनिहाय पथके तयार करून पोलिस बंदोबस्तात बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. एकीकडे कारवाईचा धडाका सुरू असतानाही भुमाफियांकडून बिनदिक्कतपणे बेकायदा बांधकाम उभारणीचे काम सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागालगत असलेल्या तीन हात नाका येथील इटर्निटी कमर्शिय प्रिमायसेस को. ऑपरेटीव सोसायटी लिमिटेड यांच्या संकुलाच्या संरक्षक भिंतीलगत बेकायदा बांधकाम उभारणीचे काम सुरू आहे. मुळ शहरात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या बांधकामाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून याप्रकरणी संकुल समितीने ठाणे पालिका आयुक्त तसेच पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे.
संकुलाच्या संरक्षक भिंतीवर दिवाळ उभारण्यात आले असून त्यात एक खिडकीही बांधण्यात आलेली आहे. संकुलाच्या संमतीशिवाय आणि मंजुरीशिवाय हे काम सुरू असल्याने संकुलाच्या सुरक्षितेलाही धोका निर्माण झाला आहे, असे समितीने पत्रात म्हटले आहे. या बांधकामावर कारवाई करून पुर्वी ज्या स्थितीत संरक्षक भिंत होती, त्या स्थिती आणावी, अशी मागणी समितीने केली आहे.
या संदर्भात ठाणे महापालिकेच्या नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्याशी संपर्क साधला असता दिव्यातील कारवाईसाठी नियुक्त केल्याने त्याठिकाणी व्यस्त होतो. या तक्रारी संदर्भात बुधवारी, आज पाहणी करून कारवाई करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.