उपमहापौरांकडूनच बेकायदा बांधकाम

उमेश नाईक हे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत.

building
उपमहापौर उमेश नाईक यांच्या संस्थेने बांधलेली तुळींज येथील शाळा व त्यांच्या हॉटेलचे वाढीव बांधकाम. 

उपायुक्तांनी आदेश देऊन दोन महिने उलटले तरी कारवाई नाही

वसई-विरार महापालिकेचे उपमहापौर आणि बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते उमेश नाईक यांच्या संस्थेने बांधलेली तुळींज येथील शाळा, त्यांच्या हॉटेलचे वाढीव बांधकाम आणि आचोळे येथील सात मजली टॉवरचे बांधकाम अनधिकृत असल्याचे उघड झाले आहे. या बांधकामांवर त्वरित कारवाई करावी असे आदेश उपायुक्तांनी फेब्रुवारी महिन्यात दिले होते. मात्र अद्याप साहाय्यक आयुक्तांनी त्यावर कारवाई केलेली नाही. उपमहापौरांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास काहीही हरकत नसल्याचे सांगितले आहे.

उमेश नाईक हे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत. नालासोपारा नगरपरिषद असताना ते पाच वर्षे उपनगराध्यक्ष आणि पाच वर्षे नगराध्यक्ष होते. सध्या ते पालिकेचे उपमहापौर आहेत. त्यांनी बांधलेली शाळा, हॉटेल, कार्यालय तसेच भागीदारीत बांधलेले टॉवर हे बेकायदा आणि अनधिकृत असल्याची तक्रार नालासापोरा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष यशवंत गायकवाड यांनी केली होती. माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार शाळेचे अनधिकृत बांधकाम असून पुढील भागात वाणिज्य वापरासाठी दुकाने काढण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नाईक यांच्या मालकीचे उत्सव हॉटेल असून त्याचेही वाढीव बांधकाम असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आचोळ्याच्या सव्‍‌र्हे क्रमांक ६० मध्ये त्यांनी भागीदारीत ७ मजली टॉवर उभारला आहे. या बांधकामाला सिडको किंवा महानगरपालिकेची कुठलीच परवानगी दिली माहिती अधिकारात उघड झालेले आहे. या पत्राच्या आधारे गायकवाड यांनी आयुक्त सतीश लोखंडे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी हे प्रकरण उपायुक्त अजिज शेख यांच्याकडे चौकशीसाठी सोपवले होते. ही बांधकामे बेकायदेशीर असून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश फेब्रुवारी २०१७ मध्ये शेख यांनी नालासोपारा प्रभाग समिती ‘ब’ चे प्रभारी साहाय्यक आयुक्त प्रेमसिंह जाधव यांना दिले होते. ८ फेब्रुवारी रोजी शेख यांनी लेखी आदेश देऊनही बांधकामे तोडण्याची कारवाई झालेली नाही.

आरोप प्रत्यारोप

उपमहापौर उमेश नाईक  यांनी हे आरोप राजकीय सूडबुद्धीने केले जात असल्याचे म्हटले आहे. शाळेचा वापर सामाजिक हितासाठी होतो. स्वस्त फी आणि चांगले शिक्षण दिले जाते. दुकानातून मिळणारे उत्पन्न शाळेसाठी वापरले जाते.  हॉटेलचे वाढीव बांधकाम असल्याचेही त्यांनी मान्य केले. मात्र आचोळे येथील टॉवरसाठी परवानगी असल्याचा त्यांनी दावा केला. दरम्यान उमेश नाईक यांचे राजकीय वजन मोठे आहे. त्यामुळे कारवाई करण्यात चालढकल होत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केला आहे. ही कारवाई लवकर नाही झाली तर या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमच्यावर कुठलाही दबाव नाही. ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले ती कितीही मोठी व्यक्ती असली तरी त्यांच्यावर कारवाई होणारच. सध्या आमच्याकडे अभियंते नसल्याने अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यास अडचण येत आहे. अभियंते आले की लगेच कारवाई केली जाईल.

प्रेमसिंह जाधव, प्रभारी साहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती ब

कारवाई दरम्यान कुठलीच अडचण येता कामा नये. आम्ही नऊ  नवीन अभियंत्यांना सेवेत घेतले आहेत. उचित कारवाई करम्ण्याच्या सूचना देण्यात येतील.

अजिज शेख, उपायुक्त, वसई-विरार महानगरपालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Illegal construction by vasai deputy mayor

ताज्या बातम्या