कागदपत्रांची सत्यता पडताळणी केल्याशिवाय वीज जोडणी न देण्याचे महावितरणचे आदेश; टिटवाळा-मांडा, आंबिवली, मोहनेत कारवाई

भगवान मंडलिक

कल्याण: कल्याण- डोंबिवली पालिका हद्दीत ‘ए’ प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा, मांडा, मोहने, आंबिवली, शहाड भागांतील नव्याने उभ्या राहणाऱ्या बांधकामांची कागदपत्रांची सत्यता पडताळणी केल्याशिवाय वीजपुरवठा देऊ नये, असे आदेश महावितरणच्या कल्याण परिमंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांनी उप विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांना दिले आहेत. यामुळे बेकायदा बांधकामे यापुढे कायमस्वरूपी अंधारात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टिटवाळा, डोंबिवली पश्चिम ‘एच’ प्रभाग, कल्याण पूर्वेतील ‘आय’, ‘डी’, ‘जे’, २७ गाव ‘ई’ प्रभागात सर्वाधिक बेकायदा बांधकामे सुरू आहेत. पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करूनही पुन्ही ती उभारण्यात येतात. त्यामुळे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना दोन महिन्यापूर्वी पत्र पाठवून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव भागातील बेकायदा बांधकामांना वीजपुरवठा न करण्याची मागणी केली होती.

महावितरणच्या धोरणाप्रमाणे वीज ही प्रत्येक रहिवाशाची अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळे विकासकाने बांधकामाची कागदपत्र दिली की त्याप्रमाणे त्या मालमत्तेला वीज पुरवठा देणे बंधनकारक आहे. विकासकाने महावितरणकडे दाखल केलेली कागदपत्र बनावट की खरी याची सत्यता पडताळण्याचे अधिकार महावितरण अधिकाऱ्यांना नसल्याने मागील १५ वर्षांत माफियांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदा इमारतींना महावितरणकडून वीजपुरवठा घेण्यात बाजी मारली होती.

दरम्यान, टिटवाळा, शहाड विभागाचे महावितरणचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांनी टिटवाळा, शहाड, मोहने, आंबिवली भागात नव्याने बांधलेल्या, उभ्या राहणाऱ्या बांधकामांची कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय एकाही बांधकामाला वीजपुरवठा देऊ नये असे सहकारी अभियंत्यांना आदेशित केले आहे.

दोन लाख ३४ हजार अनधिकृत बांधकामे

पालिका हद्दीत एकूण दोन लाख ३४ हजार अनधिकृत बांधकामे आहेत. सद्य:स्थितीत ५०० हून अधिक बांधकामे या विविध भागात सुरू आहेत. ही बांधकामे रोखण्यासाठी आयुक्त सूर्यवंशी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले होते. टिटवाळा ‘अ’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी प्रभाग स्तरावर महावितरणच्या अधिकाऱ्यांना पत्र देऊन टिटवाळा, मांडा, मोहने, आंबिवली, शहाड, वडवली भागात बांधलेल्या एकाही नवीन बेकायदा बांधकामाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. आयुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या पत्राची गंभीर दखल महावितरणच्या वरिष्ठांनी घेतली.

टिटवाळा, कल्याण पूर्वेतील आय प्रभागातील चिंचपाडा, अडिवली-ढोकळी परिसरातील सुमारे ८० हून अधिक बेकायदा इमारतींना वीजपुरवठा देऊ नये असे महावितरण अधिकाऱ्यांना कळविले आहे. उपनिबंधक कार्यालयांना या इमारतींमधील सदनिकांचे नोंदणीकरण करू नये असे कळविले आहे. महावितरणने वीजपुरवठा न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन पालिकेच्या बेकायदा बांधकामे रोखण्याच्या मोहिमेला सहकार्य केले आहे.

राजेश सावंत, सहाय्यक आयुक्त, कंडोमपा

आपल्या विभागात नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारतींची बांधकाम मंजुरी, बांधकाम पूर्णत्व दाखला, ताबा प्रमाणपत्र या कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय नवीन बांधकामाला वीजपुरवठा देण्यात येऊ नये. उपविभाग स्तरावर आपण योग्य ते निर्णय घेऊन कार्यवाही करावी.

दीपक पाटील, अधीक्षक अभियंता, महावितरण