scorecardresearch

पारसिक बोगद्यावरील वाहतूक रोखा

रेल्वेचे जिल्हाधिकारी आणि ठाणे महापालिकेला पत्र

पारसिक बोगद्यावरील वाहतूक रोखा

रेल्वेचे जिल्हाधिकारी आणि ठाणे महापालिकेला पत्र

ठाणे : मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील पारसिक बोगद्यावर वसलेल्या बेकायदा बांधकामांमुळे पारसिक बोगद्यावर भार येत आहे. त्यामुळे बोगद्याच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यातच आता कळव्याच्या दिशेकडे असलेल्या बोगद्याच्या माथ्यावरून दुचाकी आणि रिक्षा या वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होऊ लागली आहे. या वाहतुकीमुळे बोगद्याखालील रुळांवर किंवा रेल्वेवर एखादे वाहन पडले तर मोठा अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे ही वाहतूक तातडीने रोखा, असे पत्र रेल्वे प्रशासनाने महापालिका तसेच जिल्हा प्रशासनास पाठविले आहे.

मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतुकीसाठी पारसिक बोगदा महत्त्वाचा आहे. या बोगद्यामधून उपनगरीय रेल्वेगाडय़ा, लांब पल्ल्याच्या गाडय़ा आणि मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेगाडय़ांची वाहतूक होत असते. गेल्या काही वर्षांत बोगदा आणि आसपासच्या परिसरात बेकायदा घरे बांधण्यात आली आहेत. महापालिका आणि वन विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील वस्त्यांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या लोकवस्तीमुळे रिक्षा आणि दुचाकींचीही संख्या वाढली आहे.  येथील रहिवासी बोगद्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी ही वाहने बोगद्याच्या माथ्यावरून ये-जा करत आहेत. त्यामुळे बोगद्यावर भार येत असून हा अतिरिक्त भार योग्य नाही, असे रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाचे म्हणणे आहे.

या वाहतुकीमुळे एखाद्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटून ते वाहन थेट रेल्वे रुळांवर पडण्याची भीती निर्माण झाली आहे. हे वाहन रेल्वेगाडीवर किंवा रुळांवर पडल्यास रेल्वे प्रवाशांच्या जीवावरही हा प्रकार बेतण्याची शक्यता आहे. ही बाब रेल्वेच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. बोगद्याच्या माथ्यावरून सुरू असलेली वाहतूक बंद करण्याची विनंती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. तसेच माथ्यावरून होणारी वाहतूक बंद करण्यासाठी दोन्ही दिशेने अडथळे उभारण्याची सूचनाही या पत्रात करण्यात आली आहे, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यासदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Illegal construction on parsik tunnel raises security issue zws

ताज्या बातम्या