बेकायदा बांधकामे, फेरीवाल्यांना अभय दिल्यास कारवाई; ठाणे महापालिकेचा इशारा

ठाणे : महापालिका क्षेत्रात करोना काळात उभी राहिलेली बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करा आणि त्यासोबतच नवीन बेकायदा बांधकामे उभी राहू देऊ नका. तसेच फेरीवाले धोरण निश्चित होत नाही, तोपर्यंत फेरीवाल्यांवरील कारवाई सुरूच ठेवा, अशा स्पष्ट सूचना महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी बुधवारी अतिक्रमण विभागाच्या बैठकीत दिल्या. बेकायदा बांधकामे आणि फेरीवाल्यांना अभय दिल्याचे आढळून आले तर संबंधित सहायक आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ठाणे महापालिकेने सध्या शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. तसेच शहरातील रस्ते आणि पदपथ अडविणाऱ्या फेरीवाल्याविरोधातही कारवाई सुरू आहे. या कारवाईदरम्यान सहायक आयुक्त कल्पिता िपपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ला फेरीवाल्याने केला असला तरी अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठीच हा हल्ला झाल्याचा दावा सहायक आयुक्त िपपळे यांनी केला होता. याबाबत महापालिका सर्वसाधारण सभेत चर्चा झाली होती. त्यावेळेस फेरीवाले आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिले होते.

त्यानुसार शहरात सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आणि या कारवाईला गती देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी बुधवारी पालिकेत अतिक्रमण विभागाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला सर्व सहायक आयुक, बिट निरीक्षक आणि अभियंते उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना

’ महापालिका क्षेत्रात करोना काळात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत, त्या बांधकामांवर कारवाई करा.

’ कोणत्याही परिस्थितीत नवीन बेकायदा बांधकामे उभी राहणार नाहीत, याची खबरदारी घ्या.

’ फेरीवाला धोरण निश्चित करण्याचे काम सुरू आहे. परंतु हे धोरण निश्चित होत नाही, तोपर्यंत फेरीवाल्यांवरील कारवाई सुरूच ठेवा.

’ बेकायदा बांधकामे आणि फेरीवाल्यांना अभय दिल्याचे आढळून आले तर संबंधित सहायक आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.