ठाणे : उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे काही महिन्यांपूर्वी मुंब्रा येथील शीळ भागात आयुक्तांना स्वतः जाऊन अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची वेळ आली होती. यानंतर पालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेनंतरही दिव्यात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामे आणि गोदामे उभारली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करा, असे पत्र ॲड. रोहिदास मुंडे यांनी आयुक्तांना दिले आहे.

दिवा भागात काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने बांधकामे सुरू असून संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नाही. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशा बेकायदेशीर बांधकामांमुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या अनधिकृत बांधकामांविरोधात दिवा शिळ नागरी हक्क समितीचे ॲड. रोहिदास मुंडे, माजी नगरसेवक हिरा पाटील, शहर प्रमुख सचिन पाटील तसेच प्रकाश पाटील यांनी तक्रार केली होती. यात सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे यांना अधिकृत पत्र देऊन तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली होती.

नागरिकांच्या हितासाठी त्वरित व निष्पक्ष कारवाई करावी, अन्यथा समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला होता. त्या पाठोपाठ या संदर्भात ॲड. रोहिदास मुंडे यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तसेच, न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला असून, परिस्थितीवर नियंत्रण न ठेवल्यास पुढील काळात न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, दिवा परिसरात वाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी करून अशा बांधकामांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.