रुंद केलेल्या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण; आयुक्तांची पाठ फिरताच फेरीवाले रस्त्यावर

ठाणेकरांना रुंद आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांवरून मार्गक्रमण करता यावे यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरभर रस्ता रुंदीकरणाचा धडाका लावला. पण तरीही शहराचा केंद्रिबदू मानल्या जाणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानक रस्त्यावर फेरीवाल्यांचे जथ्थे दिसू लागल्याने या रुंदीकरणाला अर्थ काय, असा सवाल आता येथून नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांमधून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

सलग महिनाभर मोहीम हाती घेऊन या भागातील व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणांवर हातोडा चालवून जयस्वाल यांनी रुंद रस्त्याचे स्वप्न ठाणेकरांना दाखविले. मात्र, रुंद झालेल्या या रस्त्यावर सायंकाळी पाचनंतर फेरीवाल्यांचे थवे दिसू लागले आहे.

ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील कोंडी दूर व्हावी आणि विकास आराखडय़ात नमूद केल्याप्रमाणे रस्त्यांची रुंदी असावी यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या सहा महिन्यांपासून शहरभर जोरदार मोहीम हाती घेतली आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले, शहर विकास विभागाचे प्रमोद िनबाळकर अशा तगडय़ा अधिकाऱ्यांची फौज दिमतीला घेऊन जयस्वाल स्वत: शहरभर पायपीट करत बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवत असतात. ठाणे रेल्वे स्थानकास लागूनच असलेल्या जुन्या रस्त्यावर व्यापारी आणि फेरीवाल्यांनी मोठे अतिक्रमण केल्याने या ठिकाणीच वाहतूक गेली अनेक वर्षे ठप्प आहे. रस्त्याच्या कडेला भरणाऱ्या बेकायदा बाजारातून महिन्याला काही लाख रुपयांचा हप्ता उकळणारे महापालिका अधिकारी, पोलीस आणि स्थानिक गावगुंडांची एक मोठी टोळी या भागात वर्षांनुवर्षे सक्रिय आहे. काही स्थानिक राजकारण्यांच्या आशीर्वादातून या भागात हप्तेखोरीचा लाखो रुपयांचा दौलतजादा सुरू असताना जयस्वाल यांनी येथील रस्त्यांच्या रुंदीकरणाचा विडा उचलला. सर्वप्रथम व्यापाऱ्यांची बेकायदा बांधकामे सलग महिनाभर केलेल्या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आली. या भागातून प्रयोगिक तत्त्वावर टीएमटीची बस वाहतूकही सुरू करण्यात आली. जेणेकरून या रस्त्यावरील बेकायदा बाजाराला आळा बसेल असा प्रयत्न होता. मात्र, दिवसरात्र राबूनही जयस्वाल यांना ठाणे स्थानकातील लाखो रुपये हप्त्याची ही साखळी काही भेदता आलेली नाही, असे चित्र आता ठसठशीतपणे दिसू लागले आहे.

बाजार भरतोच आहे!

गेले काही दिवस सुट्टी आणि त्यानंतर परदेश दौऱ्यावर गेलेले जयस्वाल सोमवारी मोठय़ा ताफ्यासह स्थानक रस्त्याची पाहणी करण्यासाठी सायंकाळी या भागात अवतरले. कामे लवकर करा आणि रहिवाशांना त्रास होऊ देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी संबंधीतांना दिल्या. आयुक्तांची पाठ फिरताच या रस्त्याच्या कानाकोपऱ्यावर फेरीवाले दिसू लागल्याने बांधकामे पाडल्याने अस्वस्थ असलेले व्यापारी आता धुसफुसू लागले आहेत. आमच्या दुकानांवर हातोडा चालविणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांचा हा बाजार दिसत नाही का, असा सवाल आता व्यापाऱ्यांकडून केला जात आहे.  धडाकेबाज म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जयस्वाल यांना बेकायदा फेरीवाल्यांकडून राजरोसपणे ठेंगा दाखविला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

फेरीवाल्यांवर नियमितपणे कारवाई सुरू आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी एक फेरीवाला तरी बसतो का ते पाहा.

-संदीप माळवी, जनसंपर्क अधिकारी, महापालिका