पालिकेच्या कारवाईविरोधात निर्णय; किरकोळ व्यापाऱ्यांचीही संपकऱ्यांना साथ

कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी शहरातील पदपथ आणि रस्ते अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या फेरीवाल्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, कल्याणात रस्ते, पदपथ अडवून बसणाऱ्या या फेरीवाल्यांना मदत करण्यासाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील घाऊक फळ आणि भाजी विक्रेते तसेच लक्ष्मी मार्केटमधील किरकोळ विक्रेत्यांनीही बुधवारपासून जाहीर करण्यात आलेल्या या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याणचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या शिवाजी चौकातील लक्ष्मी मार्केटमध्ये आजमितीस सुमारे ८५० भाजी-फळ विक्रेते व्यवसाय करीत आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनेक व्यापारी या बाजारातील व्यापाऱ्यांना मालाचा पुरवठा करत असतात. या दबावामुळे बाजार समितीही या बेकायदा बाजारावर कारवाई करण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसत होते. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी मात्र वाहतूक कोंडी, परिसरातील अस्वच्छता आणि विकासकामे आदी प्रश्नांना महत्त्व देत या बेकायदा बाजाराविरोधात कारवाईचे हत्यार उगारले. त्यामुळे संतापलेले व्यापारी आता संपाच्या तयारीला लागले आहेत. ‘महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या कारवाईविषयी भाजी विक्रेत्यांना पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. यासंदर्भात आम्ही महापौर आणि महापालिका आयुक्तांची भेटही घेतली होती, अशी माहिती फळ-भाजी व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी मोहन नाईक यांनी दिली. महापालिकेची भाजी विक्रेत्यांविरोधातील भूमिका अन्यायकारक असून, त्यामुळे शेकडो व्यावसायिकांच्या पोटावर गदा येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजी-फळ विक्रेत्यांच्या या बंदमुळे कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, शहाड, ठाणे, मुंब्रा, कळवा, दिवा आदी शहरातील भाजी विक्रेत्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कल्याणमध्ये पुणे जिल्ह्य़ातील खेड, मंचर, ओतूर, नारायणगाव तसेच नाशिक, जव्हार, मोखाडा, शहापूर, मुरबाड आदी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी येतो. त्यांच्या पुरवठय़ावरही विपरीत परिणाम होत आहे, असे या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. म्हणूनच बुधवारपासून बाजार समिती आणि लक्ष्मी बाजारातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली आहे.