परराज्यातुन अवैध पद्धतीने विक्रीसाठी महाराष्ट्रात आणण्यात येत असलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे भरारी पथकाने शनिवारी पहाटे पाच वाजता भिवंडी येथे धडक कारवाई करून जप्त केला. या कारवाईत ४३ लाख रुपयांचा मद्यसाठा आणि एक टेम्पो वाहन जप्त करण्यात आले आहे. तर या मद्याची वाहतूक करणाऱ्या गणेश सौन्नी (३८) आणि निलेश अस्वार(२८) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा- डोंबिवलीत फडके रोडवरुन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकी स्वारांनी लांबवले

मद्यविक्रीतून शासनाला मोठा महसूल प्राप्त होत असतो. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मद्याची विक्री करण्यासाठी शासनाला महसूल भरणे विक्रेत्यांना अनिवार्य असते. मात्र, अनेकदा हा महसूल बुडवून अवैध पद्धतीने मद्याची वाहतूक करण्यात येत असते. यासर्व गोष्टींना आळा बसावा म्हणून राज्य उत्पादन शुल्काच्या वतीने गैरपद्धतीने मद्याची वाहतूक करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येत असते. अशाच पद्धतीने राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे भरारी पथकाने शनिवारी पहाटे पाच वाजता भिवंडी येथे धडक कारवाई करून मद्यसाठा जप्त केला. नाशिक – मुंबई महामार्गाला लागून असलेल्या भिवंडी येथील राजधानी धाब्यासमोर मद्याच्या साठा असलेल्या वाहनाबाबत ठाण्याच्या भरारी पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. या माहितीनुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छापा टाकून मद्याचा साठा जप्त केला. हा सर्व मद्याचा साठा दादरा नगर हवेली आणि दमण येथून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला होता. या कारवाईत १८ खोक्यांमध्ये असलेला ४३ लाख १ हजार ७०० रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा- वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला; एकाला अटक

यामध्ये २५ लाख ६० हजार रुपये किमतीच्या विदेशी मद्याचा समावेश आहे. मद्याची वाहतूक करणाऱ्या गणेश सौन्नी आणि निलेश अस्वार यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडील एमएच ०४ केयु ५५१४ या क्रमांकाचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या ठाणे विभागाकडून अधिक तपास सुरु आहे.