परदेशातून आलेल्या चौघांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल नकारात्मक 

ठाणे : परदेशातून शहरात आलेल्या चार नागरिकांचा शीघ्र प्रतिजन चाचणी अहवाल दोन दिवसांपूर्वी सकारात्मक आला असला तरी, त्यांच्या आरटीपीसीआर चाचणीत करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जनुकीय क्रमनिर्धारणमध्ये काहीच आढळून येणार नसल्याचा दावा करत या नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच ठाण्यात तूर्तास तरी ओमायक्रॉनची धास्ती नसल्याचा दावाही प्रशासनाने केला आहे.

परदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती विमानतळ प्रशासनाकडून संबंधित महापालिकांना दिली जात असून त्याआधारे महापालिकेची आरोग्य पथके संबंधित नागरिकांचा शोध घेऊन त्यांची करोना चाचणी करीत आहेत.

ठाणे शहरात २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधी विविध देशांतून सुमारे ८५० नागरिक आले. विमानतळ प्रशासनाकडून या नागरिकांची यादी मिळताच पालिका प्रशासनाने त्यांची करोना चाचणी केली आहे. त्यात एकलाही करोनाची बाधा झालेली नाही. २९ ते २ डिसेंबर या कालावधीत ठाणे शहरामध्ये परदेशातून ३० ते ३२ नागरिक आले असून त्यातील चार नागरिकांचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला होता. चार पैकी तिघेजण एकाच कुटुंबातील आहेत. त्यातील तिघेजण नेदरलँड तर एकजण कॅनडामधून आला आहे. या चौघांची मुंबई विमानतळावर करोना चाचणी झाली नव्हती. त्यामुळे पालिकेने त्यांची शीघ्र प्रतिजन चाचणी केली होती. त्यात त्यांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. पालिकेने या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणीही केली होती. त्याचा अहवाल नुकताच आला असून त्यात त्यांना करोना संसर्ग झाला नसल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्याने त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारणामध्ये काहीच आढळून येणार नसल्याचा दावा करत या नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार नसल्याचे पालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त मनीष जोशी यांनी स्पष्ट केले.

सात दिवसांनी पुन्हा चाचणी

परदेशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची २९ नोव्हेंबरपासून करोना चाचणी करण्यात येत आहे. तरीही शासनाच्या निर्देशानुसार सात दिवसांनी या नागरिकांची पुन्हा चाचणी केली जात आहे. याशिवाय, २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत परदेशातून आलेल्या नागरिकांची विमानतळावर करोना चाचणी करण्यात आलेली नव्हती. या नागरिकांची पालिकेने करोना चाचणी केली असून त्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. परंतु शासनाच्या निर्देशानुसार त्यांची सात दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.