ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर ” कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” असे वादग्रस्त विधान करत त्यानंतर माफीनामा देणाऱ्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( एआयएम) पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांची एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सहार शेख यांची पाठराखण करत किरीट सोमय्या यांची खिल्ली उडवत त्यांना खुले आव्हान दिले.
ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा शहरातून पाच नगरसेवक निवडून आणत एआयएमआयएम पक्षाने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला होता. पाच नगरसेवकांमध्ये निवडून आलेल्या नगरसेविका सहर शेख यांनी विजयानंतर भाषण करताना ” कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है ” असे वक्तव्य करत आव्हाडांना डिवचले होते. त्यांच्या या भाषणावर सर्वत्र विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्याकडून तक्रारी दाखल होताच मुंब्रा पोलिसांनी तिची चौकशी केली. यादरम्यान, तिने माफीनामा लिहून देत सभेत वापरलेले वाक्य हे पक्षाच्या झेंडा आणि निशाणीच्या संदर्भात होते, असे तिने स्पष्ट केले आहे. यानंतर पोलिसांनी हे प्रकरण दप्तरी नोंद केले आहे.
सहर शेखने दिलेल्या माफीनाम्यानंतर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मुंब्य्रात येऊन तीची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केले. यावेळी त्यांनी सहर विरोधात तक्रार दाखल करणाऱ्या किरीट सोमय्यांवर टिका करत त्यांचा तोतला असा उल्लेख केला. भाजपचे नेते नितेश राणे यांनी भडकावू भाषण केले होते.
अहमदनगरचा अजित पवार गटाचा एक नेता मुस्लिम बांधवांबाबत वादग्रस्त वक्तव्य करतो. भाजपची एक महिला पदाधिकारी वादग्रस्त विधान करते. अशा किती लोकांना नोटीस दिली. यांना कायदा वेगळा आहे आणि आम्हाला वेगळा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. एखादा तोतला चार पाच लोक घेऊन येतो म्हणून तुम्ही नोटीस देता. मी मुंब्रा पोलिसांना सांगू इच्छितो की, यापेक्षा दहा पट लोक घेऊन येऊ शकतो, असे जलील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो शहरातील प्रत्येक चौकात लावलेले दिसतात. त्या फोटोंवर “भगव्याची शान” अशा प्रकारचे मजकूर लिहिलेले आहेत. मग अशा परिस्थितीत आमच्या एका मुलीने केलेल्या विधानावर इतका मोठा वाद का निर्माण केला जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
आमच्या नगरसेविका सहर ही पहिल्यांदाच निवडून आलेली असून तिच्या वक्तव्यातील उत्साह हा नवख्या लोकप्रतिनिधीचा जोश आहे. मात्र तिच्या विधानावरून तिला घाबरवण्याची, दबाव आणण्याची भाषा केली जात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. कायदेशीर कारवाईची धमकी दिली जात असली, तरी कायदा आम्हालाही माहिती आहे. कोणत्या कलमान्वये काय कारवाई होऊ शकते, हे स्पष्ट करावे, असे त्यांनी सांगितले.
किरीट सोमय्यांना खुले आव्हान
मी केलेल्या विधानावर आता काय कारवाई करणार, हे मला बघायचे आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आम्ही ती उघडपणे मांडत राहू. नगरसेविकेवर अनावश्यक दबाव टाकला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही बैठक घेऊन स्पष्ट सांगितले की, हे आमच्या पक्षाचे मत आहे.
आम्हाला जनतेने निवडून दिले आहे. विजय मिळाल्यानंतर लोकांचे आभार मानणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे हेच आमचे प्राधान्य आहे. मुंब्रा परिसरात किरीट सोमय्या यांनी पुन्हा येऊन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तर मी स्वतः पुन्हा इथे येईन. भर चौकात मोठी स्क्रीन लावून त्याच्या खऱ्या चरित्राचे दर्शन घडवले जाईल, जेणेकरून लोकांना वास्तव कळेल. आम्हाला नैतिकतेचे धडे देण्याआधी संबंधितांनी स्वतःचे चारित्र्य तपासावे, असे खुले आव्हान त्यांनी दिले.
